वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने टेरीफ वॉरद्वारे जगभरात खळबळ माजवली असताना आता स्मार्टफोन,कॉम्पुटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स सामानाला टॅरिफमधून सूट देण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे.या निर्णयामुळे अमेरिकी ग्राहकांना हाय-टेक उत्पादनांच्या किमतीवरील भार कमी होणार आहे. अमेरिकी सीमा शुल्क आणि सीमा सुरक्षा कार्यालयाने जारी केलेल्या नोटीसमध्ये ही सूट जाहीर केली. यामध्ये चीनमधून अमेरिकेत येणाऱ्या स्मार्टफोन आणि त्यांच्या सुट्या भागांसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स सामानाचा समावेश आहे, ज्यावर सध्या १४५ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाते. तसेच, सेमीकंडक्टरला अमेरिकी व्यापारी भागीदारांवर लावण्यात आलेल्या १० टक्के बेसलाइन टॅरिफ आणि चीनवर लादलेल्या १२५ टक्के अतिरिक्त शुल्कातूनही वगळण्यात आले आहे. या सूटमुळे ट्रंप यांनी या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केलेल्या १० टक्के व्यापक कर आणि चीनमधून येणाऱ्या सामानावर लादलेल्या दंडात्मक कराची व्याप्ती कमी झाली आहे. सूट मिळालेल्या उत्पादनांमध्ये हार्ड ड्राइव्ह आणि कॉम्प्युटर प्रोसेसरसारख्या वस्तूंचा समावेश आहे, ज्या सामान्यतः अमेरिकेत तयार होत नाहीत.
दरम्यान, जागतिक व्यापार संघटनेच्या माल व्यापार परिषदेच्या पहिल्या वार्षिक बैठकीत ‘पारस्परिक टॅरिफ’ हा मुद्दा उपस्थित झाला. अमेरिकेने या बैठकीत ‘पारस्परिक टॅरिफ’ लागू करण्याचे समर्थन केले, तर चीनने याचा तीव्र विरोध केला. चीनी प्रतिनिधीने सांगितले की, अमेरिकेच्या एकतर्फी व्यापारी उपायांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता वाढली आहे. हे उपाय स्थिर वातावरण नष्ट करत असून, सर्व देश, विशेषतः विकसनशील देशांच्या व्यवसाय विकासावर परिणाम करत आहेत. चीनने राष्ट्रीय सुरक्षेच्या गैरवापराचा ठाम विरोध दर्शवला आहे.