स्मृती इराणी, राजनाथ ते राहुल गांधी लोकसभेची लक्षवेधी लढत

0

नवी दिल्ली : पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील १४, महाराष्ट्रातील १३, पश्चिम बंगालमधील सात, ओडिशा आणि बिहारमधील प्रत्येकी पाच, झारखंड आणि जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी तीन जागांचा समावेश आहे. लडाख येथेही सोमवारीच मतदान होईल. प्रमुख उमेदवारांमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, साध्वी निरंजन ज्योती यांचा समावेश आहे. याशिवाय कौशल किशोर, डॉ. भारती पवार, शंतनू ठाकूर, कपिल पाटील हे मंत्री, अन्नपूर्णा देवी, भाजप नेते राजीव प्रताप रूडी आणि राष्ट्रीय जनता दलाच्या रोहिणी आचार्य यांचेही भवितव्य ठरणार आहे.

मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मतदान केंद्रावर पुरेसे छत, पिण्याचे पाणी, रॅम्प, स्वच्छतागृहे व इतर मूलभूत सुविधा असणे आवश्यक आहे, अशा सूचना आयोगाने दिल्या आहेत. मतदारांमध्ये ४.६९ कोटी पुरुष, ४.२६ कोटी महिला आणि ५,४०९ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. या ४९ संसदीय जागांपैकी ३९ सर्वसाधारण, अनुसूचित जमातीच्या तीन आणि अनुसूचित जातीसाठी राखीव सात जागा आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, ८५ वर्षांवरील ७.८१ लाखांहून अधिक नोंदणीकृत मतदार, ७.०३ लाख दिव्यांग आणि १०० वर्षांचे व त्या पुढचे २४,७९२ मतदार आहेत. त्यांना घरबसल्या मतदानाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी आयोगाने १५३ निरीक्षक तैनात केले आहेत. काही राज्यांमध्ये विशेष निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. एकूण २१६ आंतरराष्ट्रीय सीमा तपासणी नाके आणि ५६५ आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यांवर दारू, अमली पदार्थ, रोख रक्कम आणि मोफत वस्तूंच्या वाहतुकीवर कडक नजर ठेवण्यात आली आहे. सागरी आणि हवाई मार्गांवरही नजर ठेवण्यात आली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech