पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द येथून समोर आलेल्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गावातील एका तरुणाकडून सातत्याने होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीने आत्महत्या केली आहे. आरोपी तरुणाने मुलीवर लग्नासाठी दबाव टाकून तिच्या पालकांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेवर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, “शाळकरी मुलीला त्रास सहन न झाल्यामुळे तिने आत्महत्या केली. हे वृत्त समोर आल्यानंतर अत्यंत खेद वाटतो. आजही आपल्या समाजात अशा घटनांमुळे अल्पवयीन मुलींना सुरक्षित वातावरणात जगता येत नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे.”
डॉ. गोऱ्हे यांनी समाजातील नागरिकांना जागरूकतेचे आवाहन करत सांगितले की, अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीची भूमिका बजावली पाहिजे. मुलींना कोणताही त्रास, छेडछाड अथवा धमकी दिली जात असेल, तर त्यांनी कोणतीही भीती न बाळगता ११२ या पोलीस हेल्पलाइन क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा. तसेच महिला सहायता संस्था जसे की स्त्री आधार केंद्र यांच्याकडे संपर्क साधून मदत घेता येईल. त्यांनी पालकांनाही आवाहन केलं की, मुलींच्या वागण्यात कोणतेही भावनिक वा मानसिक बदल जाणवले, तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याशी संवाद साधावा. सुरक्षितता, भावनिक आधार आणि समजूतदारपणाची गरज असलेल्या अशा प्रसंगांमध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.
डॉ. गोऱ्हे यांनी शैक्षणिक संस्थांनाही या विषयात पुढाकार घेण्याचे सुचवले. शाळा व महाविद्यालयांमध्ये लैंगिक शिक्षण, स्वसंरक्षण, कायदेशीर हक्क आणि मदत केंद्रांची माहिती देणारे कार्यक्रम नियमितपणे राबवले जावेत. समाजानेही अशा घटना रोखण्यासाठी एकत्र येऊन सतर्कता बाळगली पाहिजे. आपल्या परिसरात कोणत्याही संशयास्पद हालचाली जाणवल्यास तत्काळ स्थानिक पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले. “या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. समाजात अशा अमानुष वागणुकीला थारा नाही. आपली जबाबदारी आहे की अल्पवयीन मुलींना सुरक्षित, सन्मानजनक आणि निर्भय आयुष्य मिळावं,” असे ठाम मत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.