* हवाई दलाच्या बंगळुरू येथील आयएएमला भेट देणारे पहिले संरक्षण मंत्री
बंगळुरू : हवाई आणि अवकाश वाहतुकीत सतत वाढ होत असल्याने एरोस्पेस मेडिसिनमधील तज्ज्ञांच्या गरजही वाढत आहे. युद्धात संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अवकाश एक प्रमुख क्षेत्र म्हणून उदयास आले आहे. आपण अंतराळात नवीन उंची गाठत असताना, एरोस्पेस मेडिसिनमध्ये आपल्याला अधिक शक्यतांचा शोध घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.
कर्नाटकातील बंगळुरू येथील भारतीय हवाई दलाच्या इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिनला (आयएएम) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज (9 मार्च) भेट दिली. संस्थेला भेट देणारे पहिले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना वैमानिक प्रशिक्षण, त्यांचे वैद्यकीय मूल्यांकन आणि एरोमेडिकल संशोधनात आयएएमची अनोखी भूमिका याबद्दल माहिती देण्यात आली.
लढाऊ वैमानिकांच्या हाय-जी प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या डायनॅमिक फ्लाइट सिम्युलेटर आणि हाय परफॉर्मन्स ह्यूमन सेंट्रीफ्यूज आणि उड्डाणात अवकाशीय संभ्रम होण्याचा धोका टाळण्यासाठी सशस्त्र दलांच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी अवकाशीय दिशाभूल सिम्युलेटरची देखील संरक्षण मंत्र्यांनी यावेळी पाहणी केली. संस्थेत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद वैद्यकीय बाह्य संशोधन प्रकल्प : प्रगत संशोधन केंद्राचा त्यांनी यावेळी प्रारंभ केला.
कोणत्याही उच्च-स्तरीय जटिल तंत्रज्ञानातील संशोधनाचा लाभ अनेक क्षेत्रांना होत असल्याने संशोधन आणि विकास वाढवण्याची आवश्यकता आहे,” असे ते म्हणाले. एरोस्पेस मेडिसिनचे महत्त्व संरक्षण मंत्र्यांनी अधोरेखित केले, अंतराळात सूक्ष्म-गुरुत्वाकर्षण, किरणोत्सर्ग आणि विलगता यासारख्या मानवाला भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले, तसेच शारीरिक आणि मानसिक बदलांबाबत देखील त्यांनी भाष्य केले.
एरोस्पेस क्षेत्रात स्वयंपूर्णता साध्य केल्याबद्दल आयएएमच्या योगदानाचे राजनाथ सिंह यांनी कौतुक केले. “एरोस्पेस मेडिसिन व्यतिरिक्त, क्रू मॉड्यूल डिझाइन आणि विकासाच्या विविध पैलूंमध्ये आयएएम एरो-वैद्यकीय सल्ला प्रदान करते. कॉकपिट रचना निर्मितीत त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. संस्थेने ॲडव्हान्सड लाइट हेलिकॉप्टर, लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर, लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर आणि लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजसच्या रचना निर्मितीत आणि विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ते देशातील सर्वात आधुनिक प्रगत मध्यम लढाऊ विमानांची रचना निर्मिती आणि विकासात देखील सल्ला देत आहे,” असे त्यांनी सांगितले.