मुंबई : मराठी मुले महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उत्तीर्ण व्हावीत आणि भारताच्या तसेच राज्याच्या प्रशासनात मराठी टक्का वाढावा यासाठी सीमा शुल्क विभागाचे अनुवाद अधिकारी सत्यवान यशवंत रेडकर हे गेल्या तीन वर्षांपासून विनाशुल्क मार्गदर्शन शिबिर आयोजित करीत असतात. असेच एक शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर बोरिवली पश्चिम येथे ३०७ वे नुकतेच पार पडले.
बीमा नगर एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, डॉ. वासुदेव शृंगी मार्ग, एल.आय.सी कॉलनी, शांती आश्रम डेपोजवळ, बोरिवली पश्चिम येथे झालेल्या या शिबिरात सुमारे सव्वाशे शालेय विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्रातील व्यक्तींना रोजगाराच्या अनुषंगाने संधीचा लाभ घेता यावा व महाराष्ट्रातील व्यक्तींची जास्तीत जास्त विविध प्रशासकीय पदांवर निवड होण्यासाठी तिमिरातून तेजाकडे ही संकल्पना सत्यवान यशवंत रेडकर गेले तीन वर्षापासून राबवित आहेत. कोकणातील ग्रामीण भागात जाऊन स्वखर्चाने ते निःशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजित करीत असतात.