– एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार दैनंदिन सरासरी 126 घटना
मुंबई – राज्यभरात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यावर जनमानसात तीव्र भावनाही व्यक्त होताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीचा अभ्यास केला तर मागील चार वर्षांत दैनंदिन सरासरी घटनांची संख्या 126 इतकीच असल्याचे लक्षात येते. 2021 मध्ये महाराष्ट्रात प्रतिदिवशी 109 महिला अत्याचाराच्या घटना घडत होत्या. विशेष म्हणजे जानेवारी ते जून 2022 या काळात ज्या सरासरी 126 घटना प्रतिदिवशी घडत होत्या, तितक्याच घटना म्हणजे प्रतिदिन 126 इतकीच संख्या आजही आहे. याचाच अर्थ मागील पाच वर्षांत सरकारे बदलली तरी अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण जवळपास सारखेच आहे.
बदलापूरची घटना आणि त्यानंतर महाविकास आघाडीने केलेले आंदोलन, बहुतेक सर्व राजकीय नेत्यांच्या दररोज येणार्या प्रतिक्रिया यामुळे एकूणच जनमानस ढवळून निघाले आहे. एनसीआरबीचे विश्लेषण केले असता असे लक्षात येते की, 2020 वर्षांत महाराष्ट्रात 31,701 महिलांवर अत्याचार झाले, त्याची सरासरी 88 घटना प्रतिदिवशी इतकी होती. 2021 या वर्षात महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटनांची संख्या अचानक 39,266 वर पोहोचली. याची सरासरी 109 घटना प्रतिदिवशी इतकी येते. जानेवारी ते जून 2022 या काळात महाविकास आघाडीच्या काळात एकूण 22,843 घटना महिला अत्याचाराच्या घडल्या. त्याची सरासरी 126 घटना प्रतिदिवस इतकी आहे. जुलै ते डिसेंबर 2022 या 6 महिन्यात 20,830 घटना घडल्या. याची सरासरी 116 घटना प्रतिदिवस इतकी येते. आता 2023 मध्ये 2022 इतक्याच घटना असून, त्याची सरासरी सुद्धा 126 घटना प्रतिदिवस इतकी येते.
यातही अल्पवयीन मुलींवरचे अत्याचाराचे प्रयत्न (पॉक्सो कलम 12, भादंवि 509) या श्रेणीतील गुन्हे पाहिले तर त्यात अचानकच 2021 पासून मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. हे गुन्हे 2017 मध्ये 94, 2018 मध्ये 48, 2019 मध्ये 94, 2020 मध्ये 48 इतके होते. ते 2021 पासून अचानक वाढले आणि ती संख्या 249 वर पोहोचली. 2022 मध्ये ही संख्या 332 इतकी आहे.
एकीकडे हा कल दिसत असताना 18 वर्षांपेक्षा वरील मुलींच्या बाबतीत विनयभंगाच्या गुन्ह्यांची संख्या ही कमी झालेली दिसून येते. 2022 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात 1317 गुन्हे नोंदले होते, ते 2023 मध्ये 1208 इतके नोंदले गेले. महिलांवरील भादंवि 354 चे गुन्हे वाढण्याचा एक पॅटर्न आहे. साधारणत: 700 ते 900 इतक्या संख्येने दरवर्षी त्यात वाढ होते. पण, असे असताना काही श्रेणीतील गुन्ह्यांमध्ये घट होताना सुद्धा दिसून येते. महिलांशी संबंधित सायबर गुन्ह्यांची संख्या जी 2022 मध्ये 116 वर गेली होती, ती 2023 मध्ये 79 वर आली आहे. मुंबईच्या बाबतीत विचार केल्यास पॉक्सोच्या अंतर्गत कलम 4 आणि 6 अंतर्गत बलात्काराचे नोंदले गेलेले गुन्हे कमी झालेले आहेत. मुंबईत 2020 मध्ये 445 बलात्कार झाले. 2021 वर्षी 524 बलात्कार अल्पवयीन मुलींवर झाले. 2022 मध्ये ही संख्या 615 वर गेली, तर 2023 मध्ये ती कमी होऊन 590 वर आली.