राज्य लोकसेवा आयोगाचा परीक्षा पुढे ढकलली..!

0

मुंबई –  अनंत नलावडे

एकाच दिवशी म्हणजेच येत्या २५ ऑगस्टला आलेली आयबीपीएस आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा तसेच पूर्व सेवा परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ जागांचा न झालेला समावेश या पार्श्वभूमीवर पुण्यात सुरु असलेल्या परीक्षार्थींच्या आंदोलनाची दखल घेत आयोगाने परवा, रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलली असून आयोगाने यासंदर्भात गुरुवारी बैठक घेऊन परीक्षा लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाची घोषणा केली.

बँकिंग क्षेत्रातील भरतीसाठी आयबीपीएस या संस्थेनेही येत्या २५ ऑगस्टलाच परीक्षा आयोजित केली आहे. याशिवाय एमपीएससीची राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुद्धा याच दिवशी होणार होती.आयोगाने त्यासंदर्भात विविध संवर्गातील पदभरतीसाठी २९ डिसेंबर २०२३ रोजी जाहीरात प्रसिद्धही केली.आणि त्यानुसार परीक्षेसाठी २५ ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली होती.परंतु, आयबीपीएस आणि एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने परीक्षार्थी कोणत्यातरी एका परीक्षेला मुकणार होते.त्यामुळे विविध राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना यांच्याकडून एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची आग्रही मागणी लावून धरण्यात आली.अशात पुण्यात काही परीक्षार्थींनीही यासंदर्भात आमरण उपोषणाला सुरुवात केली. त्यात काहींची प्रकृती अस्वस्थ झाल्याने काही राजकीय विरोधकांनीही यात उडी घेतली. त्याची सर्वंकष दखल घेत लोकसेवा आयोगाने तातडीने बैठक घेत एमपीएससीचीच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला.

यासर्व गोंधळात लोकसेवा आयोगाने राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश केला नव्हता.त्यामुळे संतप्त झालेल्या परीक्षार्थीनी पुण्यात शास्त्री रस्ता येथे ठिय्या आंदोलन सुरु केले होते.या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खा. सुप्रिया सुळे, आ.रोहित पवार यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या अध्यक्षांना परीक्षार्थींच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली होती.

आयोगाने आज घेतलेल्या निर्णयानुसार येत्या २५ ऑगस्टला आयोजित नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला असून प्रस्तुत परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे आयोगाने म्हटले असून आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याबद्दल फडणवीस यांनी आयोगाचे आभार मानले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech