तक्रार करणाऱ्यांना दमदाटी… पालिका प्रशासनाची डोळेझाक
टिटवाळा : कल्याण येथील बिर्ला कॉलेजसमोर असलेली अनधिकृत हॉटेल्स सध्या येथील रहिवाश्यांची डोकेदुखी ठरली आहे. या ठिकाणी रहिवाशी क्षेत्रात खुलेआम पालिका प्रशासनाच्या मेहरबाबीने अनधिकृत व्यावसायिक हॉटेल आणि धाबे चालवले जात असुन त्यातुन येणारे सांडपाणी हे येथील नागरिकांच्या घरात शिरत आहे. त्यामुळे येथील रहिवाशी असलेल्या नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. येथील स्थानिक रहिवासी गोविंद प्रजापती यांनी याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप केला आहे. या ठिकाणचे अनेक हॉटेल्स हे परवान्याशिवाय सुरू असून, त्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह, केडीएमसीआयुक्त तसेच सबंधित प्रशासनाकडे त्यांनी तक्रार केली आहे.
बिर्ला कॉलेजसमोर काही अनधिकृत हॉटेल्स सुरू असून, त्या अश्या अनेक धाब्यांची या ठिकाणी गर्दी वाढत असुन या हॉटेल्सच्या ड्र्नेज लाईन्स सतत तुंबत असल्याने येथील पाणी हे सरळ येथील नागरी वस्तीत शिरत असल्याने रहिवाशांना आरोग्यविषयक समस्या उद्भवत आहेत. येथील परिसर हा रहिवासी भाग असूनही या ठिकाणी व्यावसायिक हॉटेल, धाबे चालवल्याने, तेथील रहिवाशांना धूर, कचरा, सांडपाणी यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या दुर्गंधीयुक्त पाण्याने येथील रहिवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत येथील रहिवाशी असलेले प्रजापती यांनी संबंधित हॉटेलविरोधात महानगरपालिकेकडे अनेक वेळा लेखी तक्रारी केल्या तसेच, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनाही मेल पाठवले, मात्र आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. स्थानिक (ब) वॉर्ड अधिकारी यांनीही दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रहिवासी भागात चालवल्या जात असलेल्या या हॉटेलचे व्यावसायिक परवाने आहेत की नाहीत याची चौकशी करण्यात आली होती. २३ डिसेंबर २०२४ रोजी संबंधित हॉटेलचे परवाने तपासले असताना ते अधिकृत नसल्याची माहिती प्रजापती यांना मिळाली , याबाबत त्यांनी सबंधित विभागाला याबाबत तक्रार करूनही हॉटेल अहुनाही सुरू आहेत. स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे हॉटेल मालक आणि प्रशासकीय अधिकारी , कर्मचारी यांचे आर्थिक लागेबंद असल्याचा आरोपही प्रजापती यांनी केला आहे.
या भागातील काही इमारती महाडा प्रकल्पाच्या अंतर्गत येतात. या इमारतींचे नुकतेच स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. महानगरपालिकेने या इमारती धोकादायक असल्याची शक्यता वर्तवली आहे. जर इमारती धोकादायक असतील, तर त्या भागात सुरू असलेल्या हॉटेल्समध्ये ग्राहकांचा जीवही धोक्यात आहे. जर उद्या काही अनर्थ घडला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल येथील नागरिक उपस्थित करत आहेत. या हॉटेल्समुळे परिसरातील रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिक स्वतःच पुढाकार घेऊन तक्रारी करत आहेत. गोविंद प्रजापती यांनी अनेक अनधिकृत हॉटेल्सचे फोटो आणि पुरावे संकलित करून महानगरपालिका, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाला पाठवले आहेत. जर हॉटेल्सकडे परवानगीचे सर्व कागदपत्रे नसतील, तर त्यांना चालू ठेवण्याची परवानगी कशी दिली जाते? महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी ठोस उत्तर दिले नाही. यावरून प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटत असल्याचे प्रजापती यांनी म्हटले आहे. तर याठिकाणी हॉटेल्सवाले काही अनधिकृत बांधकाम करत असतानाचे फोटो काढत असताना प्रजापती यांना दमदाटी करून धमकावण्यात आले याबाबतची तक्रार त्यांनी पोलिसांत केली असून . आपल्या जीविताला धोका असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या तक्रारीत म्हटले आहे .
बिर्ला कॉलेज परिसरात अनधिकृत हॉटेल्स आणि त्यांच्यामुळे होणारा त्रास पाहता, रहिवाशांनी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित हॉटेल्सवर तोडक कारवाई करून, त्यांना दंड ठोठावावा आणि रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर नागरिकांनी पुढील आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर ब वार्डच्या सोनम देशमुख यांना यबाबत विचारले असता सर्व्हे चालु असुन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारावई करु असे मोघम उत्तर दिले आहे. तर केडीएमसीचे मलनिसारण विभागाचे अधिकारी घनश्याम नवांगुले यांना विचारणा केली असता याबाबतची तक्रार प्राप्त झाली असुन फिल्ड मुकादम यांना स्पॉट सर्व्हे करुन एकुण एक ड्रेनेजलाइन मॅनहोल तपासणी करण्यास सांगितले आहे. सर्व्हेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असे सांगत सावध पवित्रा घेतला आहे .