उदय सामंत यांच्या उपस्थितीत पावशीत कार्यकर्ता मेळावा
सिंधुदुर्ग : एकमेकात समन्वय साधून पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन शिवसेनेचे संपर्क मंत्री तथा राज्यचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज शिवसैनिकांना केले. संपर्कमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर उदय सामंत पहिल्यांदाच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. कुडाळ तालुक्यात पावशी येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. दरम्यान शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत आणि संजू परब यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त करताना काही अपेक्षांसोबतच खंत देखील व्यक्त केली. एकंदरीतच महायुतीमध्ये शिवसेना पक्ष संघटना मजबूत करताना महायुती मध्ये समन्वय साधून काम केले पाहिजे असा सूर या कार्यकर्ता मेळाव्यातून उमटला.
पावशी येथील वाटवे हॉल मध्ये या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दीपप्रज्वलन करून मेळाव्याला सुरवात झाली. यावेळी संपर्क मंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, उपनेते संजय आंग्रे, संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि संजू परब, संजय पडते, सचिन वालावलकर, वर्षा कुडाळकर, आनंद शिरवलकर, बबन शिंदे, रुपेश पावसकर, वैशाली पावसकर, अरविंद करलकर, दादा साईल, योगेश तुळसकर, राजा गावकर, आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितीतांचे स्वागत दत्ता सामंत, संजू परब यांनी केले.
यावेळी बोलताना उदय सामंत यांनी समन्वय साधून पक्ष संघटना मजबूत केलेली पाहिजे असे आवाहन केले. जिल्हा प्रमुख दत्ता सामंत आणि संजू परब याना वाटणारी खंत खरी आहे. त्यावर एकत्र बसून मार्ग काढता येईल असे त्यांनी स्प्ष्ट केले. ते म्हणाले कि आपले नेते एकनाथ शिंदे यांनी कोण कोण पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत याची चौकाशी माझ्याकडे केली. सर्वांची आपुलकीने चौकशी करणारा आपला नेता आहे. त्यामुळे सर्वानी प्रामाणिकपणाने पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सगळ्यांनी समनव्यातुन काम करावे. आपण महायुतीत आहोत त्यामुले अन्य पक्षाशी शुद्ध समन्वय ठेवला तर निलेश राणे याना तिसरा डोळा उघडण्याची गरज भासणार नाही. संजू परब यांनी व्यक्त केलेल्या मताशी सहमत असून दत्ता सामंत यांची पण तक्रार योग्य आहे. सिंधुदुर्गसाठी मोठ्या नेत्यांनी वेळ दिला पाहिजे या मताचा मी आहे. . जिल्ह्यात राहून संघटना बाधली पाहिजे. मुंबईत राहून संघटना वाढणार नाही. जिल्ह्यात राहिले पाहिजे. असा टोला त्यांनी काही नेत्यांना लगावला.
नवे जुने याच कॉम्बिनेशन नक्की करू. काही नेत्यांनी पदाची वहिवाट केली असेल तर त्यांचा पण बंदोबस्त करून युवा पिढीला संधी दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. उपस्थित कार्यकर्त्यांनी सभासद नोंदणी कडे लक्ष दिले पाहिजे. माऊथ पब्लिसिटीने देखीक शिवसेना वाढते हे बाळासाहेब यांनी दाखवून दिलं.त्यामुळे त्याकडे त्यांनी लक्ष वेधले. महायुतीच्या बैठकीत समन्वय समिती बाबत कोटा ठरलेला आहे. त्यात काही होणार नाही. तसेच माझा फोटो बॅनर वर नाही लावला तरी चालेल. फोटोवरून मतभेद नको. फोटो मानसन्मान या पलीकडे पक्ष आहे. फक्त पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवा, असे आवाहन त्यांनी शेवटी केले. आमदार दीपक केसरकर म्हणाले, आपण महायुतीत आहोत हे भान सर्वांनीच राखायला लागेल. सर्वाना एकत्र बसण्याची गरज आहे. उबाठा च्या लोकांवर पहिला अधिकार शिवसेनेचा आहे. हिंदुत्वाचा विचार कायम राहिला पाहिजे. आज या विचारला बदनाम करण्याच काम सुरू आहे. खरी शिवसेना कोणती हे शिंदे साहेबांनी सिद्ध करून दाखवले आहे. युती समान तत्वावर झाली पाहिजे. असे ते म्हणाले.
आमदार निलेश राणे म्हणाले, आपला पक्ष लहान नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांकडे योग्य मागणी करावी. भविष्यातील शक्यता गृहीत धरून किंवा तसा विचार करून काहीतरी अयोग्य मागणी करून वातावरण बिघडवू नका. मेहनत आपल्याला करायची आहे. आम्ही कमी पडू कदाचित पण आपण काम केलं पाहिजे. आपला कोणी शत्रू नाही जिल्ह्यात. महायुती एक कुटुंब आहे. काम होत नाही असे मला जाणवले नाही. आपण चांगला बेस तयार करूया. नेत्यांकडे विकासात्मक मागणी तयार करूया. असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. रवींद्र फाटक म्हणाले, उदय सामंत याना सिंधुदुर्गची जबाबदारी दिली आहे. पक्ष वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. 24 एप्रिल ला एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग मध्ये येणार आहेत. निलेश राणे, दत्त सामंत, संजय पडते यांच्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे. येणाऱ्या निवडणूक जिंकायच्या असतील तर बांधणी केली पाहिजे. प्रत्येक तालुक्याला मानसन्मान मिळाला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
संजय आंग्रे म्हणाले कि, कार्यकर्ते अडचणीत आहेत. पण निलेश राणे मुळे अडचण जाणवणार नाही. केसरकर सामंत यांच्यामुळे सिंधुदुर्गवर अन्याय होणार नाही. निलेश राणेना लवकर मोठी जबाबदारी पक्षातर्फे मिळेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. संजू परब यांनी पक्षांतर्गत काही बाबीविषयी खंत व्यक्त केली. ज्यांना शिवसेना पक्षात यायचे आहे, त्यांना ते आहेत तिथेच थांबवले तर ते भविष्यात कुठेतरी दुसरीकडे जातील अशी भीती आहे.वरिष्ठानी आमचे म्हणणे ऐकून सोडून देऊ नये. नाहीतर भविष्यात निवडणूकित वेगळे निकाल दिसतील. जिंकण्याच्या उद्देशान प्रत्तेक कार्यकर्त्यांने काम करावे. वरिष्ठानी सुद्धा कार्यकर्त्यांशी हितगुज सुद्धा करावे. एखाद्या दौऱ्याने काही होणार नाही. असे सांगितले.
दत्ता सामंत यांनी गुरुजींच्या भूमिकेत जात उपस्थित पदाधिकाऱ्यांची शाळाच घेतली. मेळाव्याला मालवण आणि कुडाळचे शाखा प्रमुख किती हजर आहेत, असा प्रश्न विचारताच अवघे ७-८ हातच वर झाले.हि नगण्य संख्या पाहून श्री. सामंत म्हणाले, शोभेसाठी पद घेऊ नका. २७९ बूथ पैकी ६ ते ७ शाखा प्रमुख हजर.असतील इतर पदाधिकारी हजर नसतील तर ही माझी खंत आहे. भविष्यात कुडाळ मालवण मधील १३३ पैकी ग्रा. प १०० पेक्षा जास्त ग्रा प शिवसेनेकडे येऊ शकतात याकडं त्यांनी लक्ष वेधले. आम्हाला अधिकार द्या. समोरच्याने युती तोडली तर आम्ही सांगू तुम्ही पण तोडा. एवढी आमची ताकद आहे. सिंधुदुर्ग मध्ये भाजप मधून सेनेत जाताना विचार करावा लागतो. आम्ही कोणाचे घर फोडायला जात नाही पण स्वतःहून कोणी येत असेल तर त्याना परवानगी द्या अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले वगैरे तालुक्यातील अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे स्वागत उदय सामंत यांनी केले. तसेच पावशी गावातील तीन कन्यांचा श्री. सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.