साबामंत्री रवींद्र चव्हाण यांचा सक्त इशारा….
मुंबई – मालवणातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारून त्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते.त्यामुळे आज घडलेली घटना ही दुर्दैवीच या घटनेची पूर्ण चौकशी होणार असून या मध्ये दोषी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणारच,असा सक्त इशारा सार्वजनिक बांधकाममंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
मंत्री चव्हाण म्हणाले की, नौदल दिनाच्या निमित्ताने भव्य असा पुतळा उभारण्याची नौदलाचीच कल्पना होती. नौदलातर्फे हा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभारण्यात येणार होता. परंतु जागेची उपलब्धता नसल्यामुळे राजकोट येथे पुतळा उभारण्याचे अंतिम करण्यात आले.नौदलाला जागा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानेच मदत केली होती.राजकोटच्या आजूबाजूची तटबंदी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फेच करण्यात आली.पुतळा उभारण्यासाठी लागणारा निधी राज्य शासनाकडूनही नौदलाला वर्ग करण्यात आला.त्यामुळे पुतळा उभारण्याची सर्व प्रक्रिया नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखे खाली आणि नियंत्रणात पूर्ण झाली. पुतळा उभारणी बाबत निविदे पासूनची सर्व प्रक्रिया नौदलातर्फे पूर्ण करण्यात आलेली असल्याचे स्पष्टीकरणही चव्हाण यांनी दिले.
कोकणामधील हवामानाचा परिणाम पाहता खाऱ्या हवेमुळे पुतळ्यासाठी वापरण्यात आलेल्या धातूवर या हवेचा परिणाम होऊन आजची घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज असून याबाबत २० ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने नौदलाला पत्र देखील दिलेले होते.जयदीप आपटे यांच्या संस्थेने हा पुतळा उभारलेला आहे.पुतळा उभारण्याचे काम नौदलाकडून त्यांना देण्यात आलेले होते.हे सर्व काम नौदलाच्या देखरेखेखाली पूर्ण झालेले असताना आज घडलेली घटना ही सर्व शिवप्रेमींसाठी अत्यंत वेदनादायीच आहे.त्यामुळे पुतळा उभारणीमध्ये जे कोणी सहभागी असतील त्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.आणि आजच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समितीही नियुक्त करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.