आदिवासी आश्रमशाळेत निकृष्ट दर्जाचे जेवण पुरवठा
इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो येथील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी काही दिवसापासून निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची गंभीर तक्रार केली आहे. मात्र या तक्रारीवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने येथील सर्व विद्यार्थी संतापले. आज दुपारी आलेले जेवणही दर्जाहीन असल्याने विद्यार्थ्यांनी टेकडीवरील खड्ड्यात फेकले. आज दुपारपासून सर्व विद्यार्थी उपाशी असल्याचे समजते. संतापलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवाध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्याकडे व्यथा मांडली. आदिवासी विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण पुरवण्याची बाब अत्यंत गंभीर असून ह्या प्रकरणी आदिवासी विकास विभागाचे जे अधिकारी, कर्मचारी, प्राचार्य, शिक्षक, ठेकेदार जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. जोपर्यंत उच्चपदस्थ अधिकारी आश्रमशाळेत येऊन प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत विद्यार्थी उपाशी राहून आंदोलन सूरूच ठेवतील असा इशारा आदिवासी नेते लकीभाऊ जाधव यांनी दिला आहे.
यानंतर सर्व विद्यार्थी जेवण पुरवणाऱ्या मुंढेगाव येथील सेंट्रल किचनला टाळे ठोकण्यासाठी लकीभाऊ जाधव यांच्या समवेत पिंप्री सदो येथून मुंढेगावकडे रवाना झाले. मात्र पोलिसांनी सर्वांची मनधरणी करून २ किमी अंतरावरून सर्वांना माघारी फिरवले. मात्र आता सर्व विद्यार्थी पिंप्री सदो आश्रमशाळेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून बसले आहेत. जोपर्यंत जबाबदार अधिकारी येऊन प्रशाम सोडवत नाही तोपर्यंत जेवणाचा त्याग करून ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. गोठविणाऱ्या कडक्याच्या थंडीत ठिय्या दिलेल्या विद्यार्थ्यांनी रात्रीचे जेवण घेऊन आलेल्या वाहनाला माघारी फिरवले आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.