* सेंट्रल इंडिया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या फार्मसी च्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ संपन्न
नागपूर : नागपुरात फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज (औषध निर्माण उद्योग )वाढत असून यामध्ये फार्मसीच्या विद्यार्थ्यांची महत्त्वाची भूमिका राहणार असून या विद्यार्थ्यांनी विद्वत्ता आत्मसात करण्यासोबतच उद्यमशीलतेची कास धरून नोकरी देणारे तसेच रोजगार निर्माते बनावे आणि विदर्भाच्या आर्थिक विकासात योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.
नागपूरच्या लोणारा स्थित सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी च्या औषध निर्माण शास्त्र अंतिम बॅचचा पदवीदान सोहळा आज 15 मार्च शनिवार रोजी धरमपेठ येथील वनामती सभागृहामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाला . त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी हिमाचलचे तंत्र शिक्षण मंत्री राजेश धीरमानी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला वाघिणीच्या दुध असे म्हणून शिक्षणाचे महत्त्व आपल्याला पटवून दिल होते . शिक्षणामुळे केवळ एका विद्यार्थ्यांचा विकास घडून येत नाही तर त्यामागे संपूर्ण कुटुंबाचा आणि समाजाचा देखील विकास घडून येतो हे सामर्थ्य विद्वत्तेमध्ये आहे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं.
कोणताही व्यक्ती हा त्याच्या जात धर्म किंवा लिंग याच्या आधारे मोठा होत नाही तर त्याच्या गुणांच्या आधारे मोठा होतो असे सांगून नितीन गडकरी यांनी मुस्लिम समाजातील तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाची सेवा करण्याचे आवाहन केले. या पदवीदान समारंभ प्रसंगी सेंट्रल इंडिया फार्मसी कॉलेजचे मुख्याध्यापक डॉ .सय्यद गुलाब तसेच कॉलेजचे इतर शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते .