सुखबीर सिंग बादल यांची शिरोमणी अकाली दलाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

0

चंदीगढ : सुखबीर सिंग बादल यांची शिरोमणी अकाली दलाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. अमृतसर येथे शनिवारी पंजाब आणि अन्य राज्यांतील सुमारे ५२४ प्रतिनिधींनीत्यांच्या नावाला अनुमोदन दिले. यामुळे पक्षाचे सर्वोच्च पद पुन्हा त्यांच्याकडे आले आहे. शिखांची सर्वोच्च धार्मिक संस्था अकाली तख्तने धार्मिक गैरवर्तनासाठी त्यांना दोषी ठरवले होते. त्यानंतर गेल्या वर्षी १६ नोव्हेंबर रोजी त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा कार्टकारिणीने स्वीकारला होता.

शिरोमणी अकाली दलाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे, पंजाबचे विकासपुरुष सुखबीर सिंग बादल यांचे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन. त्यांनी पंथ आणि पंजाबच्या हक्कांचे मजबूतपणे रक्षण करावे आणि पंजाबला पुन्हा एका समृद्ध बनवावे. प्रमुख नेत्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या अनुभवामुळे आणि नेतृत्वामुळे पंजाबच्या राजकारणात पक्षाला मजबूती मिळेल. अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर सुखबीर सिंग बादल यांनी सर्व नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि सांगितले, आमचे ध्येय पंजाबच्या हितांचे संरक्षण करणे आणि अकाली दलाला अधिक बळकट करणे आहे. आम्ही पंजाबचे शेतकरी, तरुण आणि सर्व समाजघटकांसाठी काम करू. आमचे प्राधान्य पंजाबची समृद्धी आणि एकता असेल.

सुखबीर सिंग बादल यांनी त्यांचे वडील आणि पक्ष प्रमुख प्रकाश सिंग बादल यांच्यानंतर २००८ मध्ये पहिल्यांदा अकाली दलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. तेव्हापासून त्यांनी गेल्या वर्षी अध्यक्षपदाचा राजीनामा देईपर्यंत पक्षाचे नेतृत्व केले. त्यांच्या निवडीनंतर आता पक्षातर्फे १३ एप्रिल रोजी तलवंडी साबो (बथिंडा) येथे एक राजकीय परिषद आयोजित केली आहे. तिथे ते पक्षाचे अध्यक्ष म्हणून संबोधित करतील. शिरोमणी अकाली दलाची स्थापना १४ डिसेंबर १९२० रोजी झाली. काँग्रेसनंतरचा दुसरा सर्वांत जुना पक्ष म्हणून या पक्षाची भारतीय राजकीय इतिहासात नोंद आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech