मुंबई – सुनीता विल्यम्स यांच्या परतीबद्दल वेगळवेगळ्या अफवा पसरत असताना नासाने दिलेल्या या माहितीमुळे जगभरातील लोकांना दिलासा मिळाला आहे. अंतराळवीर बोइंग स्टारलाइनर अंतराळ यानाने अवकाश भरारी घेण्यापूर्वीच हे मिशन काही कारणास्तव रद्द करण्यात आले होते. त्यानंतर हे अंतराळवीर अवकाश स्थानकावर पोहोचल्यानंतर अंतराळयानात तांत्रिक अडचणी आल्याने परतीच्या वेळेत तीन वेळा बदल करण्याची वेळ आली. अंतराळ स्थान केंद्रावर सध्या ९ सदस्यीय अंतराळवीर दल कार्यरत आहे.
सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांनी अंतराळ स्थान केंद्रावर एक महिन्यापेक्षा जास्त काळ घालवला आहे. ही वाढीव मुदत असून त्यांचे प्रारंभिक नियोजन केवळ १० दिवसांचे होते. भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स अंतराळ स्थान केंद्रावर सुरक्षित असून १० जुलैला रात्री ८:३० वाजता पृथ्वीशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती नासाने दिली आहे.
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी ५ जून रोजी अंतराळात तिसऱ्यांदा यशस्वी उड्डाण केलं होतं. त्यांच्यासह त्यांचे सहकारी बुच विल्मोरदेखील होते. या गगनभरारीचं जगभरातून कौतुक करण्यात आलं. मात्र, सुनीता विल्यम्स यांचे अंतराळयान स्टारलाइनरमध्ये तांत्रिक बिघाड झाला असून त्याचे पृथ्वीवर परतणे कठीण झाले आहे. १४ जून रोजी ते पृथ्वीवर परतणार होते, मात्र या बिघाडामुळे ते अद्याप परतू शकलेले नाहीत.
त्यामुळे जगभरातून काळजी व्यक्त होत असतानाच या प्रकरणी नासाने एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. त्यानुसार येत्या ४५ दिवसांच्या आत हे दोन्ही अंतराळवीर सुखरुप पृथ्वीवर पोहोचणार आहेत. तसेच आज १० जुलै रोजी रात्री ८:३० वाजता ते पृथ्वीशी संवाद साधणार आहेत. सुनीता विलियम्स यांनी अंतराळ स्थान केंद्रावर गेल्या चार आठवड्यांत येणाऱ्या मोहिमांसाठी लागणारे उपकरण आणि सामान वेगळे करण्याचे काम केले आहे. त्यांनी अंतराळ स्थान केंद्राच्या फिल्टर्सची हवा वाहतुकीची देखरेखही केली. थोडक्यात, अंतराळातील अंतराळवीरांचे काम खूप महत्वाचे आहे. येत्या ४५ दिवसांतच त्या पृथ्वीवर पोहोचतील, अशी सर्वांना आशा आहे.