सुनीता विलियम्स ९ महिन्यानंतर पृथ्वीवर परतणार, क्रू १० मधील सहकाऱ्यांना पाहून आनंद

0

वॉशिंग्टन : मागील ९ महिन्यांपासून अंतराळात अडकलेले अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना पुन्हा पृथ्वीवर घेऊन येणारे नासा आणि स्पेसएक्सचं क्रू १० मिशन अंतराळ स्थानकात पोहचलं आहे. हे यान दोघांना पुन्हा पृथ्वीवर घेऊन येणार आहे. नासा आणि स्पेसएक्सचं यान अंतराळात पोहचल्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. अंतराळात सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना आणण्यासाठी फाल्कन ९ रॉकेटच्या माध्यमातून क्रू १० मिशन ड्रॅगन स्पेसक्राफ्ट सकाळी ९.४० मिनिटांनी अंतराळ स्थानकात पोहचले आहे. या यानातून अंतराळात जाणाऱ्या सदस्यांपैकी अमेरिकेचे २ अंतराळवीर एक मॉक्कलेन आणि निकोल आयर्स आहेत. त्याशिवाय जपानचे तुकुया ओनिशी आणि रशियाचे किरिल पेस्कोव हे देखील आहेत. या सर्वानी सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांची भेट घेतली.

पृथ्वीवर परत नेण्यासाठी पोहचलेल्या अंतराळ यानातून उतरलेल्या इतरांना पाहून सुनीता आणि बुच यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. हे दोघेही त्यांच्या इतर अंतराळ सहकाऱ्यांना पाहून खुश झाले आणि गळाभेट घेऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर सर्वांनी डान्स केला, जल्लोष केला. क्रू १० सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांच्याकडे पोहचले आहेत. परंतु, आता काही दिवस ते अंतराळ स्थानकात काही माहिती जमा करतील. त्यानंतर आठवडाभरात सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर स्पेस एक्स कॅप्सूलच्या माध्यमातून इतर सहकाऱ्यांसोबत पृथ्वीवर परतण्याची अपेक्षा आहे. जर वातावरण ठीक असेल तर स्पेस कॅप्सूल बुधवारी १९ मार्च आधीच स्पेस स्टेशनहून फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर लँड करेल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech