नवी दिल्ली : फॅमिली फर्स्ट हे काँग्रेसचे मॉडेल असून आमचे मॉडेल नेशन फर्स्ट आहे आणि जनतेने आमचे विकासाचे मॉडेल स्विकारले आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. काँग्रेसमध्ये सबका साथ, सबका विकास शक्य नाही. सबका साथ, सबका विकास हे काँग्रेसच्या आकलनाच्या पलीकडे आहे. काँग्रेस पक्ष फक्त एकाच कुटुंबापुरता मर्यादित झाला आहे. फॅमिली फर्स्ट हे काँग्रेसचे मॉडेल आहे, असेही मोदी म्हणाले.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस होता. संसदेमध्ये आज पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही सभागृहामध्ये धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. राष्ट्रपतींचे भाषण आमच्यासाठी प्रेरणादायी होते. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात विकसित भारताचा संकल्प होता. राष्ट्रपतींनी पुढे जाण्याचा मार्ग दाखवला. दोन्ही सभागृहात चर्चा झाली आणि ज्याला त्यांचे भाषण समजले त्याने ते त्याच्या मनाप्रमाणे स्पष्ट केले. सबका साथ सबका विकासबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे, त्यात काय अडचण आहे? ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जनतेने आम्हाला तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली.
जनतेने आमच्या विकासाच्या मॉडेलला पाठिंबा दिला. काँग्रेस सतत गोंधळ उडवत आहे. जनतेने आमच्या विकासाच्या मॉडेलला तपासले आणि समजून घेतले तसेच त्याला पाठिंबा दिला. काँग्रेसमध्ये खोटेपणा, फसवणूक आणि तुष्टिकरण यांचे मिश्रण आहे. २०१४ मध्ये देशाला एका नवीन मॉडेलचा पर्याय मिळाला. काँग्रेसच्या काळात तुष्टीकरणाचे राजकारण सर्वोच्च बिंदूला पोहोचले होते. जिथे एखादा पक्ष संपूर्ण कुटुंबाला समर्पित झाला आहे, तिथे ‘सबका विकास, सबका साथ’ शक्यच नाही. निवडणुकीच्या काळात काँग्रेस मतांची पेरणी करत होते. काँग्रेसने जनतेच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती. आम्ही योजनेचा जास्तीत जास्त फायदा देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही सबका साथ, सबका विकासचा नारा प्रत्यक्षात आणला. मात्र काँग्रेसकडून देशात जातीवादाचे विष पसरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
काँग्रेसला बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किती द्वेष होता आणि त्यांच्याबद्दल किती राग होता हे दाखवणारी सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत. दोनदा निवडणुकीत त्यांना पराभूत करण्यासाठी काय केले गेले नाही? काँग्रेसने बाबासाहेबांना कधीही भारतरत्नसाठी पात्र मानले नाही. आज नाईलाजाने काँग्रेसला जय भीम म्हणायला लागते, ज्यामुळे त्यांचे तोंड कोरडे पडते.
आम्ही ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. आम्ही जनतेला देव मानतो. पूर्वी लोकांमध्ये दुश्मनी निर्माण करण्याचे मार्ग अवलंबले जात होते. पण आम्ही सामान्य वर्गातील गरीबांना देखील १० % आरक्षण दिले. कोणत्याही तणावाशिवाय गरीबांना आरक्षण मिळाले. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले. आम्ही दिव्यांगांसाठी मिशन मोडमध्ये काम केले. ट्रान्सजेंडर समुदायाच्या उत्थानासाठीही प्रयत्न केले. विकास यात्रेत महिलाशक्तीचा मोठा वाटा आहे, असेही मोदी म्हणाले.