पुणे – बारामतीत महाविकास आघाडीच्या वतीने राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती व महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी बारामतीच्या तीन हत्ती चौकात आंदोलन केले गेले. या प्रसंगी सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, कॉंग्रेस, आपसह महाविकास आघाडीतील पक्ष सहभागी झाले होते.मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळयाबाबत झालेली घटना ही वेदनादायी व दुःखदायक आहे, राज्यात कॉन्ट्रॅक्टर लॉबीच लाडकी झालेली असून या प्रकारात सहभागी असलेल्या सर्वांवर कडक कारवाई व्हायला हवी, अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती, महिलांवर वाढलेले अत्याचार याची जबाबदारी स्विकारुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
बदलापूरच्या घटनेनंतर लोकांच्या मनात प्रचंड राग आहे, लोक रस्त्यावर उतरले तेव्हा सरकार जागे झाले. लाडक्या बहिणीची लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आठवण आली नाही, लोकांनी त्यांना जागा दाखवून दिल्यानंतर आता ते बहिणीकडे पाहत आहेत, आम्ही तुम्हाला दोन हजार देतो पण आयाबहिणींची सुरक्षितता जपा असे आता महिलाच म्हणून लागल्या आहेत. राज्यातील महिला सुरक्षित राहायलाच हव्यात या साठी रस्त्यावर उतरणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे.