भिवंडी – भिंवडीतील शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी काल्हेर येथील शासकीय, वन विभागाची आणि स्थानिकांच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप माजी खासदार कपिल पाटील यांच्या पुतण्यावर केला आहे. या प्रकरणातून त्यांनी थेट पाटलांशीच पंगा घेतल्याचे बोलले जाते आहे. त्यांनी केलेल्या गंभीर आरोपांबाबत पाटीलही बाळ्या मामांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले जाते.
म्हात्रेंच्या आरोपानुसार, काल्हेर येथील सुमारे २६ एकर शासकीय जमीनीसह वन विभाग व स्थानिकांच्या जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. यात बिल्डर श्रीधर पाटील, नितीन पाटील, भरत पाटील यांचा सहभाग आहे. त्यावर त्यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. तसेच हे बिल्डर माजी खासदार कपिल पाटील व त्यांचे पुतणे देवेश पाटील यांच्या नावाने शेतकरी आणि नागरिकांना धमकावतात. स्थानिक गुंडांना हाताशी धरून लोकांची फसवणूक करतात.
म्हात्रे म्हणाले, काल्हेर येथील संबंधित जमिनीवर अनधिकृत बांधकाम सुरू आहे. या जमिनी बळकावणे आणि अनधिकृत बांधकामांबाबत तहसीलदार, उप विभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, एमएमआरडीएकडे पुरव्यांसह तक्रार करणार आहे,” दरम्यान, खासदार म्हात्रेंच्या आरोप कपिल पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी फेटाळले असून म्हात्रेंनी केलेल्या आरोपावर वकिलामार्फत कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले.