बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे गौरोद्गार
माय मुंबई प्रोजेक्ट फोटो’ प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन
मुंबई : जे स्वत: बेघर आहेत, अशांनी मुंबईची टीपेलेली छायाचित्रे अचंबित करणारी आहेत. समाजाने नाकारलेल्या बेघरांच्या नजरेतून मुंबईचे ख-या अर्थाने दर्शन होते, असे गौराद्गार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी काढले. निमित्त होते, ‘माय मुंबई प्रोजेक्ट फोटो’ प्रदर्शनाच्या उद्घाटनाचे !
‘पहचान’ संस्थेच्या माध्यमातून ५० बेघर नागरिकांना कॅमेरे देऊन, त्यांच्या दृष्टिकोनातून मुंबईची छायाचित्रे टिपण्याची संधी देण्यात आली. एकूण १ हजार १०७ छायाचित्रांमधून निवडलेल्या सुमारे ४० छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबई प्रेस क्लब येथे भरविण्यात आले आहे. या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या हस्ते मुंबई प्रेस क्लब येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राज्य सनियंत्रण निवारा समितीचे अध्यक्ष उज्वल उके, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, ज्येष्ठ छायाचित्रकार प्रशांत नाकवे, ब्रिजेश आर्य, सार्थक बॅनर्जीपुरी आदी यावेळी उपस्थित होते.
भूषण गगराणी म्हणाले की, बेघर नागरिकांच्या जीवनातील अनुभव आणि त्यांच्या दृष्टिकोनातून मुंबईचे विविध पैलू या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून समोर येतात. ही अभिनव संकल्पना आहे. त्यामुळे शहराच्या सामाजिक वास्तवाचे दर्शन घडते. समाजाने बाजूला सारलेल्या नागरिकांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी ‘पहचान’ संस्थेने राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. बेघरांच्या निवा-यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सदैव कार्यरत आहे, असेदेखील गगराणी यांनी नमूद केले. यावेळी राज्य सनियंत्रण निवारा समितीचे अध्यक्ष उज्वल उके, अनिल गलगली, ज्येष्ठ छायाचित्रकार प्रशांत नाकवे यांनी मनोगत व्यक्त केले.