तामिळनाडू : भाजपा-एआयडीएमके युतीची घोषणा

0

चेन्नई : तामिळनाडूतील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अण्णाद्रमुख (एआयडीएमके) आणि भाजप यांच्या युतीची आज, शुक्रवारी घोषणा करण्यात आली. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तामिळनाडू दौऱ्यावर होते. यावेळी अण्णाद्रमुकचे नेते पलानीस्वामी आणि भाजप नेते के. अन्नामलाई यांच्या उपस्थितीत शहा यांनी दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा केली.
याप्रसंगी शहा म्हणाले, राष्ट्रीय स्तरावरील निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील, तर तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी अनेक वर्षे राष्ट्रीय राजकारणात एकत्र काम केले आहे. तामिळनाडूत भाजप पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत एनडीए प्रचंड बहुमताने विजयी होईल आणि तामिळनाडूमध्ये एनडीएचे सरकार स्थापन होईल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.

तामिळनाडूमध्ये डीएमके पक्ष सनातन धर्म, तीन भाषा धोरण (थ्री लँग्वेज पॉलिसी) आणि इतर अनेक मुद्दे पुढे करत आहे, ज्याचा उद्देश लोकांचे लक्ष खऱ्या मुद्द्यांपासून विचलित करणे हा आहे. आगामी निवडणुकीत तामिळनाडूची जनता द्रमूक सरकारच्या प्रचंड भ्रष्टाचारावर, कायदा-सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या स्थितीवर, दलित आणि महिलांवरील अत्याचाराच्या प्रश्नावरून मतदान करणार आहे. द्रमुक सरकारने ३९ हजार कोटी रुपयांचा मद्य (दारू) घोटाळा, वाळू उत्खनन घोटाळा, ऊर्जा घोटाळा, मोफत धोती योजनेतील भ्रष्टाचार, परिवहन विभागातील घोटाळा असे अनेक घोटाळे केले. आम्ही हे मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहोत. तामिळनाडूची जनता द्रमूककडून उत्तर मागणार आहे. ही नवीन युती आता कायमस्वरूपी राहणार आहे, म्हणूनच यामध्ये थोडा वेळ लागला. भाजप तामिळ भाषेचा गौरव करतो. पंतप्रधान मोदींनीच संसदेत ‘संगोल’ स्थापित केल्याचे शहा यांनी सांगितले.

दरम्यान तामिळनाडू भाजपची जबाबदारी आता नागेंन्द्रन यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तिरुनेलवेली येथून भाजपचे आमदार असलेले नागेन्द्रन यांचा राजकीय प्रवास अण्णा द्रमुकपासून सुरू झाला होता. राज्याध्यक्षपदासाठी साधारणतः आवश्यक असलेल्या 10 वर्षांच्या प्राथमिक सदस्यत्वाऐवजी नागेन्द्रन यांनी भाजपमध्ये फक्त ८ वर्षे घालवली असली, तरी पक्षामध्ये याआधीही धोरणात्मक कारणांसाठी अपवाद करण्यात आलेले आहेत. नागेन्द्रन हे मुक्कुलथोर (मरावर) समाजाचे आहेत. अण्णा द्रमुक नेतृत्वात त्यांची स्वीकृती ही भाजपसाठी फायद्याची ठरू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.-

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech