चेन्नई – तामिळनाडूतील कल्लाकुरिची येथे विषारी दारू पिल्याने मृतांची संख्या आता ५७ वर पोहोचली आहे. जिल्हा प्रशासनाने सोमवारी ही माहिती दिली. तर सुमारे १५६ जणांवर विविध शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्लाकुरीची मेडिकल हॉस्पिटलमध्ये ११० जणांवर उपचार सुरू आहेत. १२ जणांना पुद्दुचेरीमध्ये तर २० जणांवर सेलममध्ये आणि चार जणांवर विल्लुपुरमच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या मुलांचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सांगितले.
दरम्यान, विषारी दारू पिऊन आजारी पडलेल्या पाच पुरुष आणि दोन महिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विषारी दारू पिऊन जीव गमावलेल्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि वसतिगृहाचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी म्हटले आहे. ज्या मुलांना त्यांचे आई-वडील दोघेही गमावले आहेत, त्यांना १८ वर्षे वयापर्यंत मासिक ५ हजार रुपयांची मदत सरकार देईल. तर मुलांच्या नावे पाच लाख रुपये तात्काळ ठेव म्हणून जमा केले जातील, असे ही मुखमंत्री म्हणाले.