जम्मू-काश्मीरमध्ये २७ हिंदू पर्यटकांचे ‘टार्गेट-किलींग’

0

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये जिहादी दहशतवाद्यांनी आज, मंगळवारी हिंदू पर्यटकांच्या एका गटावर गोळीबार केला. यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहे. दहशतवाद्यांनी पर्यटक महिलेच्या हातातील बांगड्या पाहिल्यावर त्यांची नावे विचारलीत आणि त्यानंतर गोळीबार केला. हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी घटनास्थळी धाव घेत परिसराला वेढा घातला आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी २.४७ वाजेच्या सुमाराला एक.के. ४७ बंदुकांनी सज्ज ४ ते ५ जिहादी दहशतवाद्यांनी देशभरातून काश्मीरला फिरण्यासाठी आलेल्या सुमारे २७ पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली. पहलगामच्या बैसरन मैदानात पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांची नावे विचारून लश्कर-ए-तोयबाच्या जिहादी दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना गोळ्या घातल्या. या हल्ल्यात जिवंत वाचलेल्या एका महिला पर्यटकाने सांगितले की, तिच्या हातातील बांगड्यांचा चुडा पाहून दहशतवाद्यांनी त्यांचे नाव विचारले. त्यावरून हे पर्यटक कुठल्या धर्माचे आहेत याची माहिती घेऊनच त्यांनी हल्ला चढवला.

या हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी तत्काळ परिसराला घेराव घातला. जखमी पर्यटकांना रुग्णालयात नेण्यात आले. तसेच दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर पिंजून काढण्यास सुरूवात केली. उल्लेखनीय म्हणजे आगामी ३ जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होत आहे. त्यापूर्वी झालेल्या या हल्ल्यावरून असे दिसते की दहशतवादी अमरनाथ यात्रेवर परिणाम करू इच्छितात. प्रवास सुरू होण्याच्या काही दिवस आधी झालेल्या या हल्ल्याचा प्रवासावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. सध्या पोलीस आणि सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आहेत आणि त्यांनी परिसराला वेढा घातला आहे. या हल्ल्याची माहिती दिल्लीत धडकताच गृहमंत्री अमित शहा यांनी मोठी बैठक बोलावली आहे. या बैठकीत गृहसचिव आणि आयबीचे अधिकारी सहभागी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच सकाळी परदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांना पहलगाम येथील हल्ल्याची माहिती मिळताच पंतप्रधानांनी तत्काळ गृहमंत्री अमित शहांशी फोनवरून संवाद साधला. तसेच कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा घटनास्थळाला भेट देण्यासाठी जम्मू-काश्मीरला रवाना झालेत.

दरम्यान पहलगामच्या घटनेसंदर्भात केलेल्या ट्विटर (एक्स) संदेशात अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान मोदींना या घटनेची माहिती देण्यात आली आणि त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने मला दुःख झाले आहे. मृतांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. या भयानक दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही आणि आम्ही दोषींवर कठोर कारवाई करू आणि त्यांना कठोर शिक्षा देऊ. असे शहा यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे. या घटनेवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, पहलगाम (जम्मू आणि काश्मीर) येथील दहशतवादी हल्ल्याच्या बातमीने खूप दुःख झाले आहे. निष्पाप नागरिकांवर झालेला हा क्रूर हल्ला भ्याड आणि अत्यंत निंदनीय कृत्य आहे. माझ्या संवेदना आणि प्रार्थना निष्पाप बळी आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

सोडणार नाही : पंतप्रधान
या दहशतवादी हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. तसे बाधित लोकांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना शिक्षा होईल. त्यांना सोडणार नाही! त्याचे वाईट हेतू कधीही यशस्वी होणार नाहीत. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आपला निर्धार अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल असे मोदी यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech