नाशिक : विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर पहिले पाऊल टाकणाऱ्या महाराष्ट्राला तब्बल दहा वर्षे मागे नेऊन विकासाची वाट रोखणारे महाविकास आघाडी सरकार व नाकर्ते मुख्यमंत्री म्हणून इतिहासात नोंद झालेले उद्धव ठाकरे तसेच मविआचे अन्य नेते यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जंग पुकारला असून महाराष्ट्रद्रोही, विकासद्रोही, शेतकरीविरोधी, महिला व युवकविरोधी मविआ विरोधात प्रदेश भाजपातर्फे दररोज आरोपपपत्र दाखल करण्यात येणार आहे, असे भारतीय जनता माजी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.त्या भारतीय जनता पार्टी उत्तर महाराष्ट्र मेडिया सेंटर नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
या वेळी व्यासपीठावर प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, भाजप ज्येष्ठ नेते विजय साने,भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बापूराव विश्वनाथ पिंगळे, प्रदेश अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्ष गणेश कांबळे, प्रसिद्धी प्रमुख राहुल कुलकर्णी, भाजप महानगर सचिव हेमंत शुक्ल, सोनल दगडे, नंदू देसाई उपस्थित होते. महाराष्ट्राच्या जनतेने २०१९ साली दिलेला कौल धुडकावून काँग्रेस व शरद पवारांच्या पक्षाच्या कुबड्या घेतलेल्या नकली शिवसेनेने महाराष्ट्राची वाट लावली. भ्रष्टाचार, विकासाला विरोध, समस्याग्रस्त शेतकऱ्यांची उपेक्षा, दुर्बल घटकांकडे दुर्लक्ष, आणि केवळ कुटुंब व पक्षपरिवाराचे भले करण्यासाठी राज्याला वेठीस धरणाऱ्या मविआ सरकारमुळे महाराष्ट्राची सातत्याने पिछेहाट झाली. येत्या काळात मविआच्या नाकर्त्या कारभाराचा पंचनामा करण्यात येणार असून महाराष्ट्राचे अतोनात नुकसान करणाऱ्या या स्वार्थी आघाडीस सत्तेपासून दूर ठेवण्याच्या जनतेच्या निर्धारास बळ देण्याकरिता भाजपने आरोपपत्रांची मालिका सुरू केली आहे, असे डॉ भारती पवार यांनी सांगितले.
स्वतःचे कोणतेच कर्तृत्व नसणारे, निवडणूकदेखील लढवू न शकणारे, ऐतखाऊ, पित्याच्या पुण्याईवर जगणारे उद्धव ठाकरे आपण आग्रह केल्यामुळे मुख्यमंत्री झाले, असा थेट आरोप शरद पवार यांनी केला होता. स्वतः उद्धव ठाकरे यांनीही, बाळासाहेबांचा पुत्र नसतो, तर मला काडीचीही किंमत नाही असे सांगून तशी कबुलीच दिली होती. मुख्यमंत्रीपदासाठी हपापलेल्या ठाकरे यांनी शिवसैनिकास मुख्यमंत्री करण्याऐवजी स्वतःच पदावर डल्ला मारला, आणि आपल्या कृतीचे समर्थन करण्याकरिता शाब्दिक कसरती सुरू केल्या. महाराष्ट्राच्या सुदैवाने त्यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्ट आघाडीचा सत्ताकाळ अडीच वर्षातच आटोपला, अन्यथा महाराष्ट्र लयास गेला असता असे सांगून डॉ भारती पवार यांनी मविआच्या सत्ताकालातील महाराष्ट्रद्रोही कामांचा पाढाच पहिल्या पत्रकार परिषदेत वाचला. सत्तेवर येताच विकासाचे प्रकल्प बंद करणारा पहिला मुख्यमंत्री असेच ठाकरे यांचे वर्णन करावे लागेल, असेही ते म्हणाले. या सत्ताकाळात राज्याच्या हिताचे एखादे तरी दखल घेण्याजोगे काम केल्याचे मविआने दाखवून द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले. मुस्लिम लांगूलचालनासाठी वक्फ बोर्ड कायद्याच्या विरोधात दंत थोपटत ज्यांनी आपल्या जन्मदात्याच्या जाज्वल्य हिंदुत्वाला तिलांजली देऊन दिवाळी साजरी करण्यासही विरोध केला, ते उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या जनतेशी कसे प्रामाणिक राहणार, असा सवालही त्यांनी केला.
मविआ सरकारने महाराष्ट्राचा विकास रोखला, महामार्ग बांधणे थांबविले, मेट्रो रेल्वेच्या कामास स्थगिती दिली, महाराष्ट्रातील उद्योगांचा मार्ग रोखला, गाय आमची माता नाही म्हणत ठाकरे यांनी गोमांस बंदी हटविली, करोना काळात आर्थिक पॅकेज देण्याची घोषणा करूनही संकटग्रस्त जनतेच्या तोंडाला पाने पुसली, कोविड काळात बॉडी बॅग, खिचडी, कोविड सेंटर, औषध खरेदी कंत्राट अशा अनेक घोटाळ्यांना संरक्षण दिले, पोलिसांकरवी खंडणीखोरी सुरू केली. अशा प्रत्येक घोटाळ्याचा पंचनामा आगामी काळात करण्यात येणार असून अशा भ्रष्ट नेत्यांना राजकारणातून हद्दपार करण्याच्या महाराष्ट्राच्या जनतेने घेतलेल्या निर्णयास समर्थन देण्यासाठी ठाकरेविरोधी महासंग्रामाचे रणशिंग फुंकण्याचा भाजपचा निर्धार आहे, असे डॉ भारती पवार यांनी जाहीर केले. पत्रकार परिषदेत नाशिक जिल्ह्यातील विविध विषयावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. भारती पवार व प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी समर्पक उत्तरे दिली.