नवी मुंबई- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीची वेळ जाहीर केली आहे.या निवडणूक मतदान वेळेत तीन तासांची वाढ करण्यात आली आहे. २६ जून रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ अशी नवीन वेळ मतदानासाठी निश्चित करण्यात आली आहे.तरी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी उत्साहाने आणि मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी म.स. पास्कर यांनी केले आहे.
यापूर्वी या निवडणुकीसाठी मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ अशी ठरवण्यात आली होती, मात्र आता त्यात वाढ करण्यात आली आहे.आता सुधारित वेळापत्रकानुसार सकाळी ७ ते संध्याकाळी ६ अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे.तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या ७ जून पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.