मुंबई – चर्चगेट येथील तेलंग मेमोरियल मुलींचे वसतिगृह आणि मातोश्री मुलांचे शासकीय वसतिगृह येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना काय अडचणी आहेत का? याची विचारपूस करून वसतिगृहाच्या स्वच्छता राखण्याच्या सूचना केल्या.
मुलांच्या वसतिगृहातील खोल्यांची,पिण्याचे पाणी व्यवस्था याची प्रत्यक्षात पाहणी करून विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा देण्यात यावे, असे सांगून वसतिगृहाचे उर्वरित राहिलेलं काम तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिल्या.
यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव अशोक मांडे, उच्च व तंत्र शिक्षण मुंबई विभागाचे सहसंचालक हरिभाऊ शिंदे, सहसंचालक प्रकाश बच्छाव, मातोश्री शासकीय वसतिगृहाचे अधीक्षक निलेश पाठक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.