मुंबई : राज्यात आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. वाऱ्यांची दिशाही बदलत असून अरबी समुद्रामध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढायला सुरुवात झाली आहे.येत्या काही दिवसांत पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मध्य भारतात कमाल तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. महाराष्ट्रावर बदलत्या हवामानाचा परिणाम अपेक्षित आहे. ही तापमान वाढ १३ मार्चपर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यात सर्वदूर कमाल तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअसहून अधिक नोंदवले जात आहे. यामध्ये कोकण विभागात सरासरीहून कमाल तापमान मोठ्या फरकाने वाढत असून दमट आणि उष्ण हवामानामुळे या विभागातील नागरिक अधिक त्रस्त आहेत.मुंबईमध्ये मंगळवारी उष्ण आणि दमट वातावरणामुळे मुंबईकर हैराण होते. सांताक्रूझ येथे सरासरीहून ३.९ अंशांनी कमाल तापमान चढे होते. या आठवड्याच्या अखेरपर्यंत कमाल तापमानाचा पारा ३७ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
विदर्भात पुढील २ दिवस कमाल तापमान २-३°C ने कमी होईल, त्यानंतर पुन्हा वाढ होईल. तसेच, किमान तापमान देखील २-३°C ने घटून पुढील २ दिवसांत पुन्हा वाढणार आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात सामान्य तापमानाहून अधिक तापमानाची नोंद होत आहे. बहुतांश ठिकाणी ३५-३८ अंश सेल्सियसची नोंद होतेय. दरम्यानच्या काळात तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होऊ शकते, अशी माहिती डॉ. के. एस. होसाळीकर (माजी प्रमुख, IMD पुणे) यांनी दिली. तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर पाणी पिणे, उन्हापासून संरक्षण या गोष्टींचा अवलंब करण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.