रविवारी बेलोरा विमानतळावर होणार ‘टेस्ट राईड’

0

अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या बेलोरा विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज झाले आहे. त्यानुसार राज्य शासनाने तयारी चालविली असून, रविवार, ३० मार्च रोजी विमानतळावर ‘टेस्ट राइड’ होणार आहे. इंदूर-अमरावती आणि अमरावती-इंदूर यादरम्यान एटीआर विमानाची परीक्षण चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर विमानतळावर पुन्हा दोन तांत्रिक चाचण्या केल्या जातील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

साधारणतः एप्रिल महिन्यात अमरावती-मुंबई एटीआर ७२ विमानसेवा सुरू होईल, अशी तयारी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने केली आहे.बेलोरा विमानतळाहून प्रवासी विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने प्रयत्नरत आहेत.गत काही दिवसांपूर्वी अमरावती विमानतळाला हवाई उड्डाणासाठी आवश्यक असलेला परवाना डीजीसीएकडून प्राप्त झाला आहे.त्यामुळे आता अमरावती विमानतळावरून हवाई उड्डाणाचा मार्ग सुकर झाला आहे. अलायन्स एअरचे अमरावती-मुंबई-अमरावती असे विमान एप्रिल महिन्यात उड्डाण करेल. डीजीसीएचे प्रमाणपत्र प्रातिनिधिक स्वरुपात एमएडीसीच्या एमडी स्वाती पांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोपविले होते. आता अमरावती विमानतळाची परीक्षण चाचणी होत असून, ही चाचणी प्रवासी वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.

प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज असलेल्या अमरावती विमानतळाची टेस्ट राइड रविवार, ३० मार्च रोजी होणार आहे. इंदूर-अमरावती विमान एटीआर ७२ अशी ही वैमानिक चाचणी आहे.त्यानंतर दोन ते तीन तांत्रिक चाचण्या झाल्यानंतर प्रत्यक्षात अमरावती-मुंबई प्रवासी वाहतूक विमानसेवा सुरू होईल. केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला जात आहे.

स्वाती पांडे, व्यवस्थापकीय संचालक,
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech