ठाणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. प्रतीक हिंदुराव यांच्या पुढाकाराने मुरबाड तालुक्यातील २००+ विद्यार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात दिनांक २२ फेब्रुवारी ‘INOX’ चित्रपटगृहात ऐतिहासिक चित्रपट “छावा” मोफत दाखवण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे पराक्रम, त्याग आणि धैर्य यांचे ज्वलंत चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. भारताच्या इतिहासातील या महत्त्वपूर्ण पर्वाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
शालेय अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना खऱ्या भारतीय इतिहासाची जाण होणे आणि त्यातून राष्ट्रप्रेम व सामाजिक बांधिलकी दृढ होणे गरजेचे आहे. इतिहास केवळ पुस्तकांमध्ये नसतो, तो अनुभवण्यातून शिकला जातो, आणि “छावा” हा चित्रपट हेच शिकवतो. राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ठरेल. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनगाथेतून प्रेरणा घेऊन युवकांनी आपल्या आयुष्यात आत्मविश्वास, धैर्य आणि नेतृत्वगुण जोपासावेत, हाच या उपक्रमामागील उद्देश आहे.