ठाणे : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त व “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह”च्या अनुषंगाने आज जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांकरिता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सुरू झालेल्या सामाजिक समता सप्ताहाचे हे दहावे वर्ष असून यावर्षी सालाबाद प्रमाणे सामाजिक समता सप्ताहास उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळाला असून आज आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यशाळेस शासकीय सुटटीचा दिवस असून देखील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने “राज्याचे ज्येष्ठ नागरिक धोरण २००७” या विषयावर व्याख्याते श्री.प्रमोद ढोकले यांनी या कायद्याची सहज व सोप्या भाषेत माहिती दिली. या व्याख्यानाला उपस्थित ज्येष्ठ नागरीक, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फुर्तपणे दाद दिली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सहायक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे समाधान इंगळे, पारसिक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर गाडे, कळवा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मधुसूदन गोडबोले, भाऊ कांबळे, रश्मी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रत्नाकर पवार, शासकीय अधिकारी-कर्मचारी व ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते.
“भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” कार्यक्रमांतर्गत सहायक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांची माहिती तथा कायद्याबाबतचे थोडक्यात विश्लेषण व श्रावणबाळ योजनेबाबतच्या येणाऱ्या अडचणीसाठीचे मार्गदर्शन सहायक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे समाधान इंगळे यांनी केले. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आभार समाज कल्याण निरीक्षक अभिजित शिंदे यांनी मानले.