पुणे – राज्यातील महिलांवर अत्याचाराचे प्रमाण कमालीचे वाढले आहे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर मी वैयक्तिक टीका करत नाही पण गृहमंत्री म्हणून त्यांचे अपयश आहे, असे सांगत सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढतेय हा केंद्राचा डेटा आहे, दोनशे कोटी जाहिरातींवर खर्च करायला आहेत पण गुन्हेगारी थांबविण्यात सरकारला अपयश येत आहे.महाराष्ट्राचे सरकार हे मंत्रालयातून नव्हे तर दिल्लीतून चालते, अनेकदा फडणवीस हे दिल्लीतून माध्यमांशी बोलतात आणि गृहराज्यमंत्री उपलब्धच नसतात. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या पण प्रत्यक्षात राज्यातील गृह विभागाची स्थिती दयनीय आहे.
राज्यात आता वर्दीची भीतीच उरलेली नाही, यंत्रणा आपण कशीही फिरवू शकतो हा विश्वास गुंडांना वाटतो, हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे, सरकार असंवेदनशील असून या राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिकट बनली आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनावर टीकास्त्र सोडले. बारामतीतील पक्ष कार्यालयात त्या माध्यमांशी बोलत होत्या. आंदोलकांवर लाठीहल्ला करायचा आणि आंदोलन केले तर तुरुंगाची हवा दाखवायची, आंदोलनकर्त्यांवर कारवाईसाठी कायदयात बदल म्हणजेच संविधान बदलण्याचीच ही तयारी असल्याचा गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांन सरकारवर केला.