अंबाजोगाई – देशातील धार्मिकता अधिकाधिक कट्टर बनविण्याचे सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अशी कट्टरता कोणत्याही धर्माची असो ती संविधानाला घातक असते, असे मत प्रसिद्ध विधीज्ञ अड. आसीम सरोदे यांनी व्यक्त केले. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीचा नाश चालवला आहे, असेही ते म्हणाले. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, बीडचे माजी खासदार काॅ. गंगाधर अप्पा बुरांडे प्रतिष्ठानच्या वतीने ‘संविधान संवादा’चे अंबाजोगाई येथे आयोजन केले होते. त्यांच्या सोबत या संवादामध्ये अड. बाळकृष्ण निढाळकर आणि अड. श्रीया यांनीही सहभाग घेतला. संविधान कीर्तनकार, ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. भारतीय संविधानाची जागोजाग कशी पायमल्ली होते आहे, हे सांगताना आसीम सरोदे पुढे म्हणाले की, संविधानिक पदावर असलेली माणसे असंविधानिक वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अलिकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 14 मतदारसंघात ‘व्होट जिहाद’ झाला आहे असे अत्यंत बेजबाबदार वक्तव्य कोल्हापूर केले आहे. त्याबद्दल त्यांना आम्ही कायदेशीर नोटीस पाठविली आहे. तुम्ही मंत्रीपदाची शपथ घेत असताना स्पष्टपणे कुणाबद्दलही आकस ठेवून वागणार असे वचन दिलेले असते. तरी इथल्या मुस्लिम समाजाविषयी आकसाने, द्वेषाने बरबटलेली विधाने केली जातात. त्यांच्या देशभक्तीवर कायम शंका घेतली जाते. तिकडे देशाच्या पंतप्रधान पदी बसलेले नरेंद्र मोदी यांनी तर लव्हजिहाद, लॅण्ड जिहाद इतकच नव्हे तर फ्लड जिहादही म्हणत आहेत. ही भाषा अत्यंत असंविधानिक आहे. अमित शहा, नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाही नासवली आहे, असेही सरोदे म्हणाले.
बदलापूर येथील चिमूरडीवर अत्याचार, त्यातील आरोपीचे इन्कांऊटर, समुद्रातील शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत भूमिकांबद्दल ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी टोकदार प्रश्न विचारले. त्याला सरोदे यांनी सडेतोड उत्तरं दिली. अॅड. श्रीया आणि अड. बाळकृष्ण निढाळकर यांनी पुणे येथे आसीम सरोदे, विश्वांभर चौधरी आणि निखिल वागळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची माहिती दिली. अड. अजय बुरांडे यांनी प्रास्ताविक भूमिका मांडताना सध्य परिस्थितीत संविधानाला निर्माण झालेला धोका आणि त्या पार्श्वभूमीवर काॅ. गंगाधर अप्पा बुरांडे प्रतिष्ठान करीत असलेले काम याचा आढावा घेतला. काॅ. गंगाधर अप्पा यांनी आयुष्यभर शोषित आणि वंचित घटकाची बाजू मांडली. तोच वारसा प्रतिष्ठान पुढे चालवत आहे. त्याचाच भाग म्हणून संविधानला 75 वर्षे होत असल्याचे औचित्य साधून ‘संविधानाची गळचेपी होत आहे काय? असा आजचा संवाद ठेवण्यात आला होता. यापूर्वी या व्याख्यानमालेत तिस्ता शटलवाड, राम पुनियानी, गोविंद पानसरे आदी विचारवंतांची व्याख्याने झाली असल्याचे काॅ. अजय बुरांडे यांनी सांगितले.