राज्यात ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

0

मुंबई : राज्यात विधानसभेच्या २८८ जागांसाठी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून राज्यात महायुती की महाविकास आघाडी यांचे चित्र स्पष्ट होईल. राज्यात गडचिरोलीत सर्वाधिक ६९.६३ टक्के, तर मुंबई शहर जिल्ह्यात सर्वांत कमी ४९.०७ टक्के मतदानाची नोंद झाली. या निमित्ताने ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. महायुतीने महिला, वयोवृद्ध यांसह समाजातील विविध घटकांसाठी लागू केलेल्या योजनांवर मतदार राजा किती खुश आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर दुसरीकडे विरोधकांकडून विविध मुद्यांवर आरोप करून राज्य सरकारचे वाभाडे काढण्यात आले, याचाही मतदार कसा कौल देतो, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यंदा महायुती (भाजप, शिंदे गट, अजित पवार गट), महाविकास आघाडी (उद्धव ठाकरे गट, काॅंग्रेस, शरद पवार गट) महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रमुख पक्षांमध्ये मुख्य लढत होत आहे. या सोबतच तिसरी आघाडी, अन्य लहान पक्ष, अपक्ष हेही रिंगणात आहेत. दिग्गज उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे, आदित्य ठाकरे, सर्व प्रमुख पक्षांचे प्रदेशाध्यक्ष, आजी-माजी मंत्री, नेत्यांची शक्ती पणाला लागली असल्याने आता शनिवार २३ नोव्हेंरला चित्र स्पष्ट होईल.

राज्यातील विभाग आणि जिल्हा निहाय मतदानाची टक्केवारी
मुंबई – ७४.९५ टक्के (मुंबई शहर – ४९.०७ टक्के, मुंबई उपनगर – ५१.७६ टक्के), कोकण – ५८.४९ टक्के (ठाणे – ४९.७६ टक्के, पालघर – ५९.३१ टक्के, रायगड – ६१.०१ टक्के, रत्नागिरी – ६०.३५ टक्के, सिंधुदुर्ग – ६२.०६ टक्के), पश्चिम महाराष्ट्र – ६१.३१ टक्के (पुणे – ५४.०९ टक्के, कोल्हापूर – ६७.९७ टक्के, सांगली – ६३.२८ टक्के, सातारा – ६४.१६ टक्के, सोलापूर -५७.०९ टक्के), उत्तर महाराष्ट्र – ५९.९९ टक्के (अहमदनगर – ६१.९५ टक्के, जळगाव – ५४.६९ टक्के, धुळे – ५९.७५ टक्के, नंदुरबार – ६३.७२ टक्के, नाशिक – ५९.८५ टक्के), मराठवाडा – ६०.६७ टक्के (छत्रपती संभाजीनगर – ६०.८३ टक्के, बीड – ६०.६२ टक्के, जालना – ६४.१७ टक्के, लातूर – ६१.४३ टक्के, नांदेड – ५५.८८ टक्के, धाराशिव – ५८.५९ टक्के, परभणी – ६२.७३ टक्के, हिंगोली – ६१.१८ टक्के), विदर्भ – ६१, ८८ टक्के (नागपूर – ५६.०६ टक्के, अकोला – ५६.१६ टक्के, अमरावती – ५८.४८ टक्के, भंडारा – ६५.८८ टक्के, बुलढाणा – ६२.८४ टक्के, चंद्रपूर – ६४.४८ टक्के, गडचिरोली – ६९.६३ टक्के, गोंदिया – ६५.०९ टक्के, वर्धा – ६३.५० टक्के, वाशिम -५७.४२ टक्के, यवतमाळ – ६१.२२ टक्के)

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech