मध्यप्रदेशमध्ये ‘छावा’ चित्रपट झाला ‘टॅक्स फ्री’

0

भोपाळ : विकी कौशल याची मुख्य भूमिका असलेला आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटाची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे.या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रात हा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ करण्याची मागणी विविध संघटना आणि पक्षांकडून होत आहे. पण, अशातच महाराष्ट्रात नाही तर एका दुसऱ्या राज्यात हा चित्रपट टॅक्स मुक्त करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी अखेर विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट करमुक्त केला आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात ही बातमी जाहीर केली आणि मराठा शासकाबद्दल जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पाहणे आवश्यक आहे, असे सांगितले. यानंतर त्यांनी त्याच्या अधिकृत एक्स हँडलवरूनही पोस्ट केली. त्यांनी लिहिलं की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांचे पूत्रसंभाजी महाराजांवर आधारित ‘छवा’ या हिंदी चित्रपटाला करमाफीची घोषणा करतो.”

दरम्यान, सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त करण्याविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, वीरता आणि विद्धवता प्रचंड होती. परंतु इतिहासाने त्यांच्यावर अन्याय केला. आता त्यांच्यावर अतिशय चांगला चित्रपट आला आहे. हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी होत आहे. परंतु महाराष्ट्रात करमणूक करच नाही. इतर राज्य जेव्हा एखादा चित्रपट करमुक्त (टॅक्स फ्री) करतात, तेव्हा ते करमणूक कर माफ करतात. परंतु महाराष्ट्राने २०१७ सालीच करमणूक कर नेहमीसाठी रद्द केला. त्यामुळे आपल्याकडे करमणूक कर नाही. आता या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी आम्हाला अधिक काय करता येईल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करु”.

‘छावा’ चित्रपटाद्वारे विकी कौशल आणि रश्मिका मंदाना ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसली. तसेच, चित्रपटात अक्षय खन्नानं मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका साकारली आहे.हा चित्रपट १४ फेब्रुवारीला रिलीज झाला आहे.या चित्रपटासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामुळे थिएटर्सनी २४ तास शो सुरू केलेत आणि सगळेच्या सगळे हाऊसफुल्ल सुरू आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech