पुणे : जातीय तेढ निर्माण होईल,अशी भीती व्यक्त करीत आगामी काळात प्रदर्शित होणाऱ्या ‘फुले’ चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेणे असमर्थनीय तसेच पुर्णत: चुकीचे आहे. तत्कालीन सामाजिक स्थितीचे वास्तव दाखवत प्रस्थापितांच्या डोळ्यात झंणझणीत अंजन घालण्याचे काम ‘फुले’ चित्रपटातून केले जाईल, असे प्रतिपादन बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी यांनी गुरूवारी (ता.१०) केले.
टिझरच्या आधारे काहींकडून चित्रपटासंदर्भात नाहक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. समाजाचे वास्तविक प्रतिबिंब चित्रपटातून दिसते.सामाजिक स्थितीचे आकलन विविध चित्रपटातून यापूर्वी देखील करण्यात आले आहे. फुले दाम्पत्याने स्त्री शिक्षणासाठी घेतलेले कष्ट सर्वश्रुत आहे. इतिहासाचे विद्रुपिकरण करणे अयोग्यच आहे, पंरतु, दाहक सत्य रुपेरी पडद्यावर मांडतांना दिग्दर्शकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचे हनन होणार नाही; याची काळजी समाजाने घेतली पाहिजे, असे डॉ. चलवादी म्हणाले.
फुले दाम्पत्याला तत्कालीन समाजकंटकांकडून मिळालेली घृणास्पद वागणूक पडद्यावर साकारणे अयोग्य आणि भावना भडकवणारे कसे ? असा सवाल डॉ.चलवादी यांनी व्यक्त केला.स्त्री शिक्षणाचा वसा घेतलेले क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीमाई फुले यांनी हे सर्व सहन केले. सावित्रीमाईंवर शेण फेकले जायचे. अशात दोन लुगडी घेवून त्या शाळेत जायच्या.अंगावर शेण फेकल्यानंतर शाळेत गेल्यावर स्वच्छ होवून दुसरे लुगडे परिधान करीत स्त्री शिक्षणाचे कार्य करायच्या.तत्कालीन समाजकंटकांनी केलेला अन्याय चित्रपटाकून दाखवण्याचे कार्य केले जात असेल तर याला विरोध का ? असा सवाल डॉ. चलवादी यांनी उपस्थित केला.
‘चित्रपट एकतर्फी नको, सर्वसमावेश असावा’ असे मत दृश्यांवर आक्षेप घेणाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आले आहे. पंरतु, चित्रपटाच्या माध्यमातून समोर येणारे तत्कालीन सामाजिक स्थितीचे वास्तव सर्वसमावेशकच असते. सर्वसमावेशकती भावना केवळ शब्दांपुरती मर्यादित ठेवून चालणार नाही. पीडित, शोषित, वंचितांचे जीवन नाकारणाऱ्यांमध्ये ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ ही भावना रुजवावी लागेल, असे मत डॉ. चलवादी यांनी व्यक्त केले. चित्रपटाच्या निमित्ताने बहुजनांवर सांस्कृतिक दबाव निर्माण केला जातोय. बहुजनांवर आतापर्यंत टाकण्यात आलेला सांस्कृतिक प्रभाव आणि दबावातून मुक्त होण्याची वेळ आली आहे. चित्रपटातील सत्यदर्शक आणि वास्तव दृश काढून नये. खरा इतिहास लोकांसमोर आलाच पाहिजे, असे आवाहन डॉ. चलवादी यांनी केले.