नवी दिल्ली- १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन उद्यापासून नवी दिल्लीत सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर लोकसभेचे हंगामी सभापती नवनिर्वाचित सदस्यांना खासदारकीची शपथ देतील.
१८ व्या लोकसभेचे हे पहिलेच अधिवेशन असून नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी झाल्यानंतर लोकसभेच्या सभापतींची निवड करण्यात येईल. २६ जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचे संसदेच्या संयुक्त सभागृहात अभिभाषण होणार आहे. त्यानंतर अभिभाषणावरील चर्चेला सुरुवात होईल. अभिभाषणावरील चर्चेचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने होणार आहे. हे अधिवेशन ३ जुलै पर्यंत चालणार आहे.