नारायण सुर्वे हे नाही रे वर्गाचे शेक्सपिअर !
सांस्कृतिक कार्यमंत्री एँड आशिष शेलार
मुंबई : ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या श्रमराज कवी नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्षात, नारायण सुर्वे यांच्या साहित्य संपदेवर आधारित कार्यक्रमाची निर्मिती महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे केली जाईल आणि राज्यातील विविध ठिकाणी कामगार साहित्याचा जागर केला जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी गुरुवारी प्रभादेवी – मुंबई येथे केली. रवींद्र नाट्यमंदिर येथे ‘मराठी आठव दिवस’ चा तृतीय वर्धापन दिन आणि सुर्वे साहित्य संमेलनाचे उद्घाटन ॲडव्होकेट शेलार यांच्या हस्ते झाले. श्रम साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या एका साहित्यिकाला ५० हजार रुपयांचा पुरस्कार वैयक्तिक आपल्यातर्फे, ‘मराठी आठव दिवस’ च्या नारायण सुर्वे वार्षिक साहित्य संमेलनात , पुढच्या वर्षापासून दिला जाईल, असेही शेलार पुढे म्हणाले.
ज्येष्ठ रंगकर्मी प्रमोद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिवसभर झालेल्या सुर्वे साहित्य संमेलनात सर्वश्री भाऊ कोरगावकर, डॉ. महेश केळुसकर, अशोक नायगावकर या ‘मराठी आठव दिवस’ च्या सुरुवातीपासूनच्या पाठीराख्यांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. तसेच प्रदीप आवटे, योगिता राजकर, मधुकर मातोंडकर, सुनील उबाळे, सुजाता राऊत, सफरअली इसफ या नवोदित साहित्यिकांना ‘जाहीरनामा पुरस्कार’ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. दर महिन्याच्या २७ तारखेला ‘ मराठी आठव दिवस’ कार्यक्रम करण्यासाठी राज्यभरातून अनेक मराठी दानशूर व्यक्ती उत्स्फूर्तपणे पुढे येत असल्याबद्दल संस्थापक रजनीश राणे यांनी समाधान व्यक्त केले.