नवी दिल्ली – पंतप्रधान मोदींनी बुधवारी बिहारमधील नालंदा विद्यापीठ या ऐतिहासिक शैक्षणिक वास्तूचे उद्घाटन केले. तब्बल १७४९ कोटी रुपये खर्चून उभ्या केलेल्या या वास्तूला भारतातील १६०० वर्षांचा इतिहास लाभला आहे. बिहार मधील एकेकाळचे आशिया खंडातील ज्ञानाचे केंद्र असलेल्या या प्राचिन भारतातील नालंदा विद्यापीठाचे पुनर्निर्माण करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी बिहारमधील राजगीर येथील स्थित या विद्यापीठाचे उद्घाटन केले. ८०० वर्षांपूर्वी परकीय आक्रमणात हे विद्यापीठ जवळपास नष्ट करण्यात आले होते. त्याठिकाणी आता एका नवीन विद्यापीठाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांनी ऐतिहासिक नालंदा विद्यापीठाच्या पुरातत्वीय स्थळाला देखील भेट दिली.
यासंबंधी पंतप्रधान मोदींनी माध्यमावर एक पोस्ट जारी केली असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, नालंदा विद्यापीठाच्या पुरातत्वीय अवशेषांना दिलेली भेट उत्तम होती. प्राचिन जगातील सर्वोत्तम ज्ञानाच्या आसनांच्या ठिकाणी उभा असण्याची ही एक संधी होती. एकेकाळी ज्ञानाची भरभराट झालेल्या भूतकाळाचे हे ठिकाण एक झलक देते. नालंदाने निर्माण केलेली बौद्धिक चेतना आपल्या देशात अशीच विकसित होत राहील.
भारताचा प्राचिन वारसा जपणा-या या विद्यापीठाला ८०० वर्षांपूर्वी विदेशी आक्रमणातून नष्ट करण्यात आले होते. हे त्याकाळचे प्राचीन ज्ञानाचे बौद्ध केंद्र होते. बौद्ध चिनी प्रवासी ुएन त्सांग इसवी सनाच्या सहाव्या शतकात भारतात आला असताना तो या ठिकाणी वास्तव्यास होता. त्याने लिहिल्याप्रमाणे हे विद्यापीठ त्याकाळी एक आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे केंद्र होते. त्याने यासंबंधी लिहून ठेवलेल्या विद्यापीठांसंबंधीच्या नोंदींआधारे १९१५ ते १९१९ या दरम्यान भारतीय पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात या ऐतिहासिक विद्यापीठाचे अवशेष सापडले होते.
आशिया खंडातील ज्ञानाचे केंद्र असलेल्या या केंद्राचे पुनरुज्जीवन करण्यात आले असून पुरातत्वीय स्थळापासून काही अंतरावर हे नवे केंद्र उभारण्यात आले आहे. या नव्या विद्यापीठाची संकल्पना २००७ मध्ये भारताचे तत्कालिन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी बिहारमधील विधानसभेतील एका विधेयकाद्वारे मांडली होती. या ऐतिहासिक नालंदा विद्यापीठात २ विद्यासंकुल बनविण्यात आले असून जवळपास १९०० विद्यार्थी क्षमतेच्या ४० वर्गखोल्या समाविष्ट आहेत. या नवीन शैक्षणिक परिसरात प्रत्येकी ३०० आसनक्षमतेची दोन सभागृहे तसेच ५५० विद्यार्थी क्षमतेचे विद्यार्थी वसतिगृह बनविण्यात आले आहे.