कल्याणातील विविध भागांत साजरी झाली २८६ वी जयंती
कल्याण : बंजारा समाजाचे कुलदैवत श्री संत सेवालाल महाराज यांनी आपल्या आध्यात्मिक आणि समाज प्रबोधनातून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. त्यामूळे श्री संत सेवालाल महाराज यांचे आदर्श विचार ही आजच्या काळाची गरज असल्याचे सांगत भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी त्यांना अभिवादन केले. श्री संत सेवालाल महाराज यांच्या २८६ व्या जयंतीनिमित्त कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात मोहने कोळीवाडा, स्व. जयंत देवळेकर मैदान, घोलप नगर, मोहने लहुजी नगर आदी परिसरामध्ये समस्त गोर बंजारा समाजातर्फे जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोहने कोळीवाडा येथील शांताराम महादू पाटील शाळेच्या पटांगणावर झालेल्या कार्यक्रमात नरेंद्र पवार बोलत होते.
संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी संत होते. मानवी कल्याणासाठी त्यांनी सर्वदूर मानवता, पर्यावरण रक्षण, गोरक्षाचा संदेश दिला. तसेच धर्मरक्षणासाठी त्यांनी लढाही उभारला. त्यासोबत समाजातील अनिष्ठ रूढी आणि शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या वाणीतून प्रहार करत सामाजिक सुधारणांसाठी आग्रही भूमिका घेतल्याचे सांगत श्री संत सेवालाल महाराज यांच्या सामाजिक आणि अध्यात्मिक कार्यावरही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी प्रकाश टाकला.
तर श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त देवळेकर मैदान येथे झालेल्या मुलांच्या संस्कृतिक कार्यक्रमाचाही पवार यांनी आनंद घेतला. तसेच मोहने लहुजी नगर येथील श्री संत सेवालाल महाराज मंदिर परिसरात आयोजित रक्तदान शिबिराला पवार यांनी भेट देऊन सहभागी रक्तदात्याना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यातही आले. यावेळी मोहोने लहुजी नगर येथे बुधाराम सरनोबत, मयूर पाटील, अंकुश जोगदंड, वैभव भोईर, रोहन कोट, महेश पाटील तसेच आयोजक अशोक चव्हाण, डॉ. युवराज राठोड, कैलास तंवर तसेच शांताराम पाटील शाळा मोहने कोळीवाडा येथे सुभाष दादा पाटील, शशिकांत पाटील, सुनिताताई राठोड, आयोजक पुरणसिंग राठोड, कपूरचंद पवार, अंबादास राठोड, आत्माराम चव्हाण, अंकुश राठोड व स्व.जयंत देवळेकर मैदान, घोलप नगर येथे मदनजी जाधव, भिमराव नायक, अशोक राठोड, आत्माराम जाधव व मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव उपस्थित होते..