मुंबई – लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधताना वक्तव्य केले की, काही लोक स्वतःला हिंदू म्हणवतात आणि 24 तास हिंसा आणि द्वेष करत राहातात. राहुल गांधींच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, संपूर्ण हिंदूंना हिंसक म्हणणे हे गंभीर आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याच्या विधान परिषद सभागृहात सत्ताधारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. प्रवीण दरेकर यांनी सुमोटा प्रस्ताव मांडला तर प्रसाद लाड हेही आक्रमक झाले होते. यावेळी बोलायला उभे राहिलेल्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना प्रसाद लाड यांनी हात दाखवला. यावरून ते आक्रमक झाले आणि त्यांनी प्रसाद लाड यांना शिव्या घातल्या. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही आक्रमक झाल्यामुळे सभागृहाचे आजचे कामकाज स्थगित करावे लागले.
सभागृहातून बाहेर आल्यावर अंबादास दानवे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, माझा काही तोल सुटलेला नाही. मी शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा कट्टर शिवसैनिक आहे. माझ्यावर कुणी बोट उचललं तर त्याचं बोट तोडायची ताकद माझ्या मनगटात आहे. राहुल गांधींचा विषय हा सभागृहाशी संबंधित नव्हता. माझ्याकडं बोट दाखवून माझ्याकडं हातवारे करून समोरच्याला सदस्याला बोलायचा अधिकार नाही. मी विरोधी पक्षनेता नंतर आहे, सगळ्यात आधी मी शिवसैनिक आहे. त्यामुळे जुम्मा जुम्मा चार दिवस करणारे भाजपा मला हिंदुत्व शिकवणार का? माझ्यावर 75 केस आहेत, सगळ्या दंगलीच्या आहेत. चार-चार वेळेस तडीपार झालेला माणूस आहे मी. शिवसैनिक आहे मी आणि मला हे लोक हिंदुत्व शिकवणार? प्रसाद लाडसारखा माणूस धंदा करणाऱ्या पक्षाचा विचार घेऊन मला हिंदुत्व शिकवणार का? असे प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केले.
सत्ताधाऱ्यांनी सभागृहात राहुल गांधींचा काय विषय मांडला होता? असा प्रश्न विचारला असता अंबादास दानवे म्हणाले की, राहुल गांधीचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही. कारण आम्ही सभागृहाच्या कामकाजात होतो. मला भाषण करायचं होतं. दोनशे साठवर बोलण्यासाठी मी माझे मुद्द्यांचा अभ्यास करत होतो. पण भाजपा वेगवेगळ्या विषयावर गोंधळ घालत असताना विरोधी पक्षनेता म्हणून मला या सगळ्या भूमिकेत बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी एवढाच प्रश्न सभापतींना केला की, राहुल गांधींसंदर्भातील विषय आपल्या सभागृहाशी संबंधित आहे का? त्यावर उत्तर देणं हे सभापतींचं काम आहे. पण सत्ताधाऱ्यांनी मला बोलायचं काही कारणच नव्हतं. त्याच्यामुळं मी माझ्या जागेपासून बाजूला सरकलो आणि मी शिवसैनिक म्हणून माझा अवतार धारण केला हे सत्य आहे.
सभागृहात सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल एकमेकांशी संवाद साधत असतत. पण सभापतीशी केलेलं वक्तव्य हे काही एकमेकांशी संवाद नसतो. म्हणून सत्ताधाऱ्यांनी सभापतीशी बोलायला पाहिजे होतं, पण त्यांनी माझ्याकडे विद्रुप हातवारे करण्याची गरज नव्हती. मला प्रसाद लाड सारखा माणूस हिंदुत्व शिकवणार का? असा प्रश्न उपस्थित करत मला काही पश्चाताप झाला नाही. मी जे बोललो त्यासंदर्भात माझ्या पक्षाचे नेते बघतील, असे स्पष्टीकरण अंबादास दानवे यांनी दिले.