रांची : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी बिहार-झारखंडच्या दौऱ्यावर होते. दिल्लीहून विमानाने देवघर येथे पोहचलेल्या पंतप्रधानांनी पुढील प्रवास हेलिकॉप्टरने केले. बिहारच्या जमुई येथे भगवान बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमासह इतर नियोजीत कार्यक्रमानंतर ते देवघरला पोहचले. परंतु, विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पंतप्रधान तब्बल 2 तास विमानतळावरच अडकून पडले. पंतप्रधानांचे विमान अडकून पडल्यामुळे विमान वाहतूक प्रभावित झाली. त्याचा इतर उड्डाणांवरही परिणाम झाला. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी झारखंडच्या देवघर येथील विमानतळावर अडकून बसले होते.
यादरम्यान 80 किलोमीटरचा परिसर नो फ्लाईंग झोन असल्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांची हेलिकॉप्टर्स उडू शकली नाहीत. त्यामुळे विरोधकांची चांगलीच गोची झाली. याशिवाय झारखंडच्या दुमका येथे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासोबत असलेले हेलिकॉप्टरही बराच वेळ अडकून पडले होते. त्यानंतर दुसऱ्या विमानाने पंतप्रधान दिल्लीला रवाना झाल्यानंतर एटीसीने इतर विमान वाहतूक सुरळीत केली. त्याचवेळी गोड्डा येथील महागामा येथे निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टरही तासभर अडकले. एअर ट्रॅफिक ब्लॉकमुळे त्यांचे हेलिकॉप्टर दुपारी 2.50 च्या सुमारास उड्डाण करू शकले.