अमरावती – भाज्यांच्या दरात १० ते २० रूपयांची वाढ झाली आहे. यामुळे शहरातील सर्वसामान्यांचे बजेट वाढले आहे. बाजारात सध्या कांदा ५० रुपये किलो तर बटाटा ४० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. लसणाचे दर सर्वाधिक असून ४५० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. शेवगा १०० ते १२० रुपये किलो तर गवार शेंग अद्याप १०० रूपये किलो दराने विकली जात आहे. जुलै महिन्याच्या प्रारंभी शंभरी गाठलेल्या टोमॅटोच्या दरात बऱ्यापैकी घसरण झाली आहे. अमरावती शहरातील किरकोळ बाजारात आता ४० रुपये किलो दराने टमाटरची विक्री सुरू आहे. परंतु, अन्य भाज्यांच्या दरात वाढ झाली असून चढ-उतार सुरू आहेत. श्रावण मुळे भाज्यांना मागणी वाढली पण टोमॅटोची ‘लाली’ उतरली आहे.
उद्या मंगळवारला श्रीकृष्ण जन्माटमीचा सण असल्याने शहरात रविवारच्या आठवडी बाजारात चांगलीच गर्दी पहावयास मिळाली. कोथिंबिरीचे दर चांगलेच वधारले असून २०० रूपये किलोवर पोहचले. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भाज्यांचे नुकसान झाल्याने उत्पादकता घटली आहे. त्यातच आता सणवार असल्यामुळे भाज्यांना मागणी आहे.भाज्यांचे दर वाढल्याने हातावर पोट भरणाऱ्या गरिबांचे आर्थिक बजेट चांगलेच अडचणीत आले.अळूची पाने खाने आरोग्यासाठीही फायद्याचे असल्याने अळूच्या पानांना मागणी आहे. शिवाय, प्रत्येकच सणवाराला अळूच्या पानांची वडी तसेच पातळ भाजी नैवेद्यात ठेवली जाते. यामुळे अळूच्या पानांना मागणी असून सध्या १०-२० रुपये जुडीनुसार अळूची पाने विकत मिळत आहेत.