पुणे : विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शुभहस्ते आज अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. हा विशेष सोहळा शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना आणि श्रीमंत माऊली प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने महिलांच्या सामाजिक आणि अध्यात्मिक सन्मानासाठी या उपक्रमाला बळ मिळाले आहे.
अध्यात्म आणि विकास यांचे नाते अतिशय जवळचे असून महिलांनी अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे.” “आळंदीच्या धाडसी महिलांचा उल्लेख करत भावनिक आठवण” लाडक्या बहिणींच्या योजनेच्या पार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “मला आठवतंय, निधी वितरणाच्या वेळी मी आळंदीला आले होते. तिथल्या महिलांचे धाडस, आत्मसन्मान आणि कष्ट पाहून मला नेहमीच अभिमान वाटतो.” अक्षय महाराज भोसले यांनी या महिलांचा सन्मान करण्याची कल्पना मांडली आणि ती लगेच मनापासून स्वीकारली गेली, असेही त्यांनी सांगितले.
आपल्या भाषणात त्यांनी संत जनाबाईंचे उदाहरण देत सांगितले की, “समाजात टीका झेलूनही त्यांनी आपले अध्यात्मिक कार्य थांबवले नाही.” ही परंपरा आजच्या महिलांनीही पुढे नेली पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला. डॉ. गोऱ्हे यांनी शेवटी माहिती दिली की, “३ मे ते १० मे या कालावधीत धर्मवीर सेनेच्या वतीने, महानगरपालिका व स्थानिक संस्थांच्या सहकार्याने भव्य अध्यात्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.” सन्मान सोहळ्याचे प्रभावी संयोजन यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार अनिताताई सुद्रिक, जेष्ठ कीर्तनकार गयाबाई यादव, मृदंगाचार्य देविदास महाराज मांडगे, विठ्ठल महाराज कापसे व वारकरी संप्रदायातील मोठे योगदान असणाऱ्या सर्व महिलांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले, श्रीमंत माऊली प्रतिष्ठानच्या प्रमुख विनित माऊली सबनीस आणि सहअध्यक्ष प्रभंजन दादा महातोले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. तर, अखिल वारकरी गुरुकुल संघाचे अध्यक्ष बाळासाहेब महाराज शेळके, माऊली महाराज सुरडकर, ज्ञानेश्वर माऊली जाधव, कैलास महाराज गायकवाड, अनंत महाराज धर्मे, किशोर महाराज धुमाळ, अंकुश महाराज कदम व सर्व आळंदीतील गुरुकुलाचे अध्यक्ष महाराज मंडळी यांचा प्रमुख सहभाग होता.