नवी दिल्ली : उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीवरून विरोधकांनी आज, सोमवारी संसदेत प्रचंड गोंधळ घातला. प्रयागराज येथे गेल्या आठवड्यात झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यूमुखी पडले होते आणि ६० जण जखमी झाले होते. त्याचे पडसाद लोकसभा आणि राज्यसभेत उमटले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज, सोमवारी लोकसभेचे कामकाज सुरूवात होताच, विरोधी पक्षातील सदस्यांनी महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीवर सभागृहात चर्चा करावी, मृतांची नावे सादर करावीत, अशी मागणी अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासमोर ठेवली. यावरून सभागृहात विरोधी पक्षातील सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. अर्थमंत्री निर्मला सीतारमन 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करीत असताना देखील विरोधकांनी याच मुद्यावरून गोंधळ घातला होता. महाकुंभ चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांची अचूक आकडेवारी जाहीर करण्याची मागणी समाजवादी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी लोकसभेत यावेळी केली. लोकसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. तर राज्यसभेत देखील या मुद्याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. दरम्यान राज्यसभेतील सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभागृहातून सभात्याग केला.