मुंबई – लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे पाच वेळा खासदार राहिलेले रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. रावसाहेब दानवे यांच्या पराभवामध्ये अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड तालुक्यांमध्ये देखील रावसाहेब दानवेंना कमी मतं मिळाली. यामुळे सत्तार विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा संघर्ष सुरू झाला आहे. जालना लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या डॉ. कल्याण काळे यांची अब्दुल सत्तार यांनी कार्यक्रमात भेट घेतली. यावेळी हे माझे जवळचे मित्र असल्याचे वक्तव्य केलं. तेव्हापासून वादाची ठिणगी पडली. त्यानंतर रावसाहेब दानवे यांनी सत्तारांवर तोफ डागत सिल्लोड आता छोटा पाकिस्तान होईल असे वक्तव्य केले.
मंत्री अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काम केले. युतीमध्ये असताना त्यांनी युतीधर्म पाळला नाही. यामुळे अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी सिल्लोड भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी केली आहे. यासाठी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा तोंडावर असताना महायुतीमध्ये धुसफूस सुरू झाली आहे.