डोंबिवली : गेली ५० वर्षे विविध स्तरावर सातत्याने सामाजिक कार्य करणाऱ्या संयुक्त महिला मंडळ डोंबिवली या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून १५ मार्च २०२५ रोजी एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे नेटके आयोजन डोंबिवली जिमखाना येथे करण्यात आले होते. आत्मसन्मान या शीर्षकाखाली तृतीय पंथीयांना आत्मसन्मान आणि समाजात समानतेची वागणूक या विषयावर तृतीय पंथीयांसाठी काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष बालरोग तज्ज्ञ डॉ उल्हास कोल्हटकर व विशेष अतिथी म्हणून केडीएमसीच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरूवातीला नृत्यगुरू सुशिला पोतदार यांच्या शिष्यांनी नृत्य सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर गेल्या ५० वर्षाच्या संयुक्त महिला मंडळाच्या कार्याची सविस्तर माहिती संस्थेच्या कार्याध्यक्षा डॉ.विंदा भुस्कुटे यांनी दिली. महिला बालक सक्षमीकरण. महिलांसाठी वसतीगृह, समुपदेशन, कायदेशीर सल्ला केंद्र, रोजगाराच्या संधी, आरोग्यशिबीरे इ. मुद्ये भुस्कुटे यांनी अधोरेखित करून व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत त्यांनी व संस्थेच्या अध्यक्ष अनुराधा आपटे यांनी केले.!
यावेळी केडीएमसीच्या आयुक्त डॉ इंदूराणी जाखडे यांनी मंडळाच्या क्रियाशील उपक्रमाचे अभिनंदन केले. व श्रीगौरी सावंत यांच्या कार्याची प्रशंसा केली.! तर अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. उल्हास कोल्हटकर म्हणाले संयुक्त महिला मंडळाचे कार्य काळानुसार मौलिक आहे. सामाजिक वैचारिक क्रांती.स्व:ताचे आरोग्य, नेतृत्व गुण.कायद्याची माहिती, समानवेतन इ.बाबत महिलांनी सतर्क व्हायला पाहिजे. मुख्य म्हणजे मुलीच्या जन्माचा उत्सव व्हायला पाहिजे! यानंतर संयुक्त महिला मंडळाच्या सुरवातीच्या कार्यकर्त्या मंगलाताई कुलकर्णी व कुसुमताई पवार यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. नंतर नृत्यगुरू शीतल कपोले यांच्या शिष्यांनी श्रीगौरी सावंत यांची जीवनरेखा नृत्यातून सादर केली.!
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे श्रीगौरी सावंत यांची डॉ विंदा भुस्कुटे यांनी घेतलेली जाहीर मुलाखत! यावेळी बोलताना श्रीगौरी म्हणाल्या वयाच्या नाजूक वळणावर असताना माझे मातृछत्र हरपले. स्व:ताची ओळख पटवून घेणं मी घरच्यांचा विरोध पत्करून गणेशाची गौरी झाले. आणि आजन्म तृतीय पंथीयांसाठी काम करण्याचे ठरविले. २००० साली मी सखी चारचौघी संस्थेची स्थापना केली. व समाजाचे मातृत्व स्विकारले. एच.आय.व्ही. एडस् सारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांसाठी अपार कष्ट केले व करीत आहे.आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही माझ्या समाजातील लोक त्यांच्या हक्का पासून वंचित होते त्यासाठी न्यायालयीन लढा देताना मला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पण शेवटी आम्हाला कायदेशीर हक्क मिळाले. समाजाच्या मुख्य धारेत तृतीय पंथीय समाजाचा स्विकार होवू लागला. पण अजूनही सर्वसमावेशकतेची भावना पूर्णपणे रूजली नाही. याची खंत वाटते. अहो माणसाने माणसांशी माणसाप्रमाणे वागावे ही माझी अपेक्षा आहे! श्रीगौरी यांची ओघवती भाषाशैली. निर्धाराने काम करण्याची वचनबध्दता. व वास्तववादी भुमिका यामुळे उपस्थित श्रोतृवर्ग अचंबित व भावविवश झाला. शैलजा भोंजाळ.दीपाली काळे यांनी मान्यवरांचे शुभेच्छा संदेश व मानपत्रांचे वाचन केले. तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुहिता सोमण खेर यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ विंदा भुस्कुटे यांनी केले.या कार्यक्रमाला तृतीय पंथीयांची उल्लेखनीय उपस्थिती होती.