नवी दिल्ली – “ही निवडणूक संविधान वाचवण्यासाठी तळागाळातील लोकांनी आपले योगदान दिले आहे. या देशात आम्हाला नरेंद्र मोदी आणि अमित शाह नको, असे जनतेने आपल्या मतदानातून सांगितले आहे. हा लोकशाहीचा विजय आहे.” असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशाबद्दल धन्यवाद केले. तसेच, भाजपसह नरेंद्र मोदींवर टीका केली. या निवडणुकीत इंडिया आघाडीला मिळालेलं यश हे लक्षणीय आहे, त्यासाठी देशातील जनतेचे आभार आहेत, असे मत मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले.
भाजपने आरक्षणावर हल्ला केल्याचे आरोप राहुल गांधींनी केले. तसेच ते पुढे म्हणाले की, “अदानीचे शेअर्स तुम्ही पाहिलेच असतील. यावरून लोक अदानी आणि मोदी यांना जोडत असल्याचे दिसून येते. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी संविधानाची प्रतही काढून घेतली आणि देशातील गरीब जनतेने ती जतन केली आहे. अनेकांनी यावर काही भाष्य केले नाही. पण देशातील सर्वात गरीब लोक ते वाचवण्यासाठी उभे राहिले. जात जनगणनेसारख्या आश्वासनांवर आम्ही ठाम राहू,” असे ते म्हणाले.
तसेच, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, “निवडणुकीचे निकाल म्हणजे जनतेचा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. ही लढाई मोदी विरुद्ध जनता आहे, हे आम्ही आधीपासून बोलत आहोत. हा निकाल आम्ही मनापासून स्वीकारतो. यावेळी जनतेने कोणत्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत दिलेले नाही. विशेषत: भाजपने एक व्यक्ती आणि एका चेहऱ्याच्या नावावर मते मागितली होती. हा जनादेश मोदींच्या विरोधात गेल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हा त्यांचा राजकीय आणि नैतिक पराभव आहे. जो स्वतःच्या नावावर मते मागायचा त्याचा हा पराभव आहे.” अशी टीका यावेळी त्यांनी केली.