यंदा लग्नसराईचा कालावधी आठ महिन्यांचा

0

मुंबई : यंदा लग्नसराईचा कालावधी आठ महिन्यांचा आहे. त्या अनुषंगाने विवाहच्छुकांची तयारी जोमात सुरू आहे. यंदा सर्वाधिक विवाह मुहूर्त जानेवारी, फेब्रुवारी, एप्रिल व मे महिन्यांत आहेत. अशावेळी वधू-वरांच्या आई-वडिलांकडून सर्वच मुहूर्ताना विशेष अशी पसंती दिली जात आहे. मात्र, यंदा नवीन वर्षात मे महिन्यात मुहूर्त अधिक असल्याने सर्वाधिक लग्न मे महिन्यातच होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दिवाळी झाली आणि त्यानंतर तुळशी विवाह झाला. त्याचबरोबर लोकशाहीचा उत्सवदेखील साजरा झाला. यावर्षी १७ नोव्हेंबरपासून लग्नाचा बार उडण्यास सुरुवात झाली असून, पुढील आठ महिन्यांत जवळपास ७० मुहूर्त आहेत. यातील तब्बल २४ मुहूर्त फेब्रुवारी आणि मे या दोन महिन्यांमध्ये आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या डोक्यावर यंदा नोव्हेंबरपासूनच अक्षता पडण्यास प्रारंभ झाला आहे. लग्न जुळलेल्या मुला-मुलींच्या कुटुंबीयांनी मंगल कार्यालयासह लग्नासाठीचे बुकिंग सुरू केले आहे. त्या अनुषंगाने उपवर मुला-मुलींच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या कालावधीत तुळशी विवाह पार पडला.

सर्व सुविधा असलेले सुसज्ज मंगल कार्यालय, पार्किंगसाठी प्रशस्त जागा, सुरक्षितता, वीजपुरवठा या बाबींना महत्त्व दिले जात आहे. अनेक कुटुंबांनी तर, मागील सहा महिन्यांपासून नियोजन करत यंदाच्या तुळशी विवाहानंतरच्या तारखांनुसार मुहूर्त काढून मंगल कार्यालयांचे बुकिंग केले आहे. लग्नाच्या अनुषंगाने दागिने आणि वस्त्र खरेदी दसरा आणि दिवाळीच्या काळात अनेकांनी केली. त्याचबरोबर लग्न समारंभ आयोजनाचे नियोजन सुरू आहे. वन्हाडी मंडळींच्या वाहनांची व्यवस्था, मंगल कार्यालय, वाजंत्री, इव्हेंट, फोटोशूट आदी विषयांवर नियोजन केले जात आहे. यंदा जूनपर्यंत ७० विवाह मुहूर्त आहेत. याशिवाय इतर तारखांबाबतही पुरोहितांकडे कुंडल्या दाखवून चौकशी केली जाते व सोयीनुसार मुहूर्त काढले जात आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech