मुंबईतील ५० रुग्णालये उडवून देण्याची धमकी

0

मुंबई – मुंबईतील ५० हून अधिक रुग्णालयांना बॉम्बने उडविण्याच्या धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील अनेक प्रसिद्ध रुग्णालयांत धमकीचे ई-मेल आले आहेत. ई-मेल पाठवणा-याने रुग्णालयांच्या बेड आणि बाथरूमच्या खाली बॉम्ब ठेवून रुग्णालय उडविण्याची धमकी दिली आहे.

धमकीचा ई-मेल पाठवणा-याने आपली ओळख लपविण्यासाठी व्हीपीएन नेटवर्कचा वापर करून सर्व ई-मेल पाठवले आहेत. हा ई-मेल मुंबईतील जसलोक हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, सेव्हन हिल हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, जेजे हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल आणि अन्य हॉस्पिटलमध्ये आल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

एकाच ई-मेलमध्ये लिहिलेला हा धमकीचा ई-मेल ५० हून अधिक रुग्णालयांना पाठवण्यात आला आहे, असे एका पोलिस अधिका-याने सांगितले. रुग्णालयांना धमकीचा ई-मेल मिळताच त्यांनी पोलिसांना कळवले. यानंतर पोलिस आणि बॉम्ब निकामी पथकाने रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

रुग्णालयांपाठोपाठ आता महाविद्यालयांनाही धमकीचे ई-मेल आले आहेत. मुंबईच्या हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये धमकीचा ई-मेल आला. ई-मेल करणा-याने कॉलेज बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर कॉलेज प्रशासनाने जवळच्या पोलिस स्टेशनला यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलिस आणि बॉम्बशोधक पथकाचे अधिकारी आले आणि त्यांनी तपास केला पण काहीही संशयास्पद आढळले नाही.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech