पुणे – पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात आता ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्याआधी रक्ताचे नमुन्यांची अदलाबदल केल्याप्रकरणी त्यांना अटक झाली होती. या प्रकरणात आता शिवसेना उबीटीच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अजय तावरे यांना मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याचे सरंक्षण असल्याचा आरोप केला आहे. तसेच अजय तावरे यांच्या जीविताला धोका असल्याचे देखील अंधारे यांनी म्हटले आहे.
सुषमा अंधारे या पत्रकारांशी बोलत होत्या. अजय तावरेचे नाव फक्त रक्ताच्या नमुने बदलण्यापर्यंत मर्यादीत नाही. ज्यावेळी अजय तावरे म्हणतात, माझ्याकडे अनेक नावे आहेत, मी तोंड उघडेन, त्यावेळी त्यांच्या बोलण्यातला गर्भित अर्थ समजून घेतला पाहिजे. तर गेल्या 10 वर्षात अजय तावरेंने काय काय बघितलं आहे हे समजून घेतलं पाहिजे असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. तसेच पल्लवी सापळे, अंजय तावरे, अजय चंदनवाले अशी अनेक नावे आहेत. या सगळ्या नावाचा सहाव्या मजल्याशी काय संबंध आहे? अडीच वर्षाचं सरकार पाडण्यात काय संबंध आहे? असा सवाल उपस्थित करत, मी यावर 4 जून नंतर बोलेन अशी भूमिका सुषमा अंधारेंनी घेतली आहे.