पुणे – कोंढव्यातील बनावट दूरध्वनी केंद्र प्रकरणात राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) तिघांना अटक केली. आरोपींकडून गेले आठ वर्ष बनावट दूरध्वनी केंद्र चालविण्यात येत असल्याची माहिती तपासात उघडकीस आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याप्रकरणी नौशाद अहमद सिद्धिकी ऊर्फ कुमार (वय ३२ रा. कोंढवा), महम्मद उजैर शौकत अली अन्सारी ऊर्फ सोनू (वय २९ भिवंडी), पियूष सुभाषराव गजभिये (वय २९ रा. वर्धा) यांना अटक करण्यात आली. तिघे आरोपी मित्र आहेत. नौशाद मूळचा उत्तर प्रदेशातील असून, तो कोंढव्यात भाडेतत्त्वावर घर घेऊन राहत होता. आरोपी पूर्वी भिंवडीत राहायचे. नौशाद, सोनू आठवी उत्तीर्ण आहेत. पियूष संगणक अभियंता आहे. तिघे कोंढव्यात बनावट दूरध्वनी केंद्र (टेलीफोन एक्सेंज) चालवायचे.
गेल्या आठ वर्षांपासून आरोपी दूरध्वनी केंद्र चालवत होते, तसेच आरोपींनी ऑनलाइन ग्राहक मिळविले होते. चीन, पाकिस्तान आणि आखाती देशांतून येणारे दूरध्वनी स्थानिक क्रमांकावर पाठविण्यात येत होते, याबाबतची माहिती एटीएसला मिळाल्यानंतर कोंढव्यातील बनावट दूरध्वनी केंद्रावर छापा टाकण्यात आला. आरोपींकडून जप्त केलेली सीमकार्ड आणि राऊटर्स न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवायचे आहेत. गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी तिघांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील बोधिनी शशीकर यांनी केली. विशेष न्यायाधीश एस. के. दुगावकर यांनी आरोपींना शुक्रवारपर्यंत (६ ऑगस्ट) पोलिस कोठडी सुनावली आहे. नौशाद याला भाड्याने घर देणाऱ्या घरमालकावर कारवाई करावी, असा अहवाल एटीएसकडून कोंढवा पोलिसांना देण्यात आला आहे.